सिन्नर : मुंबई महानगरपालिकेत नोकरीला लावून देतो सांगत चार बेरोजगार युवकांची चार लाख २० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांविरोधात सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मूळ जामगाव येथील विमल साबळे यांना सावळीराम बोडके याने त्याचा चुलत भाऊ राहुल बोडके हा मुंबई महापालिकेत सुशिक्षित मुलांना कामाला लावून देत असल्याचे सांगितले होते. त्यानंतर १ जून २०१४ रोजी राहुल बोडके जामगाव येथे आला होता. क्लार्क पदासाठी त्याने साडेचार लाख रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर विमल साबळे यांनी मुलगा चेतन साबळे यास नोकरीला लावून देण्यासाठी चार लाखाची बोलणी केली होती. त्याच दिवशी १ लाख रुपये घेतले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर १७ जून रोजी मुंबई केईम हॉस्टीपटल येथे वैद्यकीय तपासणीसाठी बोलावून तपासणी केली. त्यानंतर लवकरच मुंबई महानगरपालिकेत कामावर हजर करतो असे आश्वासन राहुल बोडके याने दिले होते.त्यानंतर विमल साबळे यांनी वेळोवेळी राहुल बोडके याच्याकडे मुलाच्या कामाबाबत विचारणा केली असता थोड्याच दिवसात कामावर घेतले जाईल असे सांगितले जात होते. काही दिवसांनी मुंबई महानगरपालिकेचे लेटर दाखवून तुमचे काम झाल्याचे सांगून साहेबांची सही बाकी असल्याचे सांगितले होते. त्यावेळी संशयित बोडके याने साबळे यांचे नातेवाईक देवेंद्र डगळे याच्याकडून १ लाख, रमेश डगळे याच्याकडून ७ हजार तर विनायक खरबडकर याच्याकडून ५० हजार रुपये घेऊन कामावर लावून देण्याचे सांगितले. मात्र कोणालाही कामाला लावून दिले नसल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. नोकरीला लावून देण्यासाठी दिलेल्या पैशांची मागणी केल्यानंतर पैसे परत देतो असे लेखी लिहून दिले होते. त्यानंतर काही दिवसांनी संशयित बोडके याने साबळे यांना २ लाख २० हजार रुपयांचा व २ लाखाचा असे दोन चेक दिले होते. मात्र चेक बॅँकेत वटले नसल्याचे साबळे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यामुळे विमल साबळे यांनी संशयित राहुल बोडके व सावळीराम बोडके यांच्याविरोधात फसवणूक केल्याची तक्रार दिली आहे. पोलिसांनी दोघा संशयिताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक राजेंद्र लोखंडे व हवालदार योगेश बुरकूल अधिक तपास करीत आहेत.दोघांविरोधात गुन्हासिन्नर तालुक्यातील मूळ जामगाव येथील रहिवासी व सध्या जेलरोड, नाशिकरोड येथे राहणाऱ्या विमल तुकाराम साबळे या महिलेने संशयित राहुल बाळकृष्ण बोडके व सावळीराम बाबूराव बोडके यांनी आपल्या मुलासह आपल्या नातेवाईकांची आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार सिन्नर पोलीस ठाण्यात दिली आहे.
नोकरीच्या आमिषाने सिन्नरच्या चौघांची लाखोंनी फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 1:05 AM