नाशिक : महापालिकेच्या वतीने फटाके विक्रीचे गाळे लिलाव करताना ३३१ ठिकाणचे लिलाव तहकूब करण्यात आले असले तरी १३९ गाळ्यांच्या लिलावातूनच चार लाख रुपयांचे उत्पन्न वाढले आहे. गेल्यावर्षी महापालिकेला २५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले होते, तर यंदा २९ लाख १४ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. त्यामुळे मनपाला दिवाळीआधीच लक्ष्मी प्रसन्न झाली आहे. महापालिकेच्या वतीने दरवर्षी फटाके विक्रीसाठी जागा निश्चित केल्या जातात. यंदा महापालिकेने २७ ठिकाणी जागा निश्चित केल्या होत्या. त्यातील ७० गाळ्यांना पोलिसांनी हरकत घेतल्याने लिलावच होऊ शकले नाहीत, तर उर्वरित ४७० गाळ्यांचे लिलाव करताना फक्त १३९ गाळ्यांचेच लिलाव झाले. त्यातून महापालिकेला २९ लाख १४ हजार ७०० रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. गेल्यावर्षी महापालिकेने ३८९ गाळ्यांचे लिलाव केले त्यातील २७६ गाळ्यांनाच प्रतिसाद मिळाला. त्या माध्यमातून महापालिकेला २५ लाख २५ हजार ८०० रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. म्हणजेच गतवर्षीच्या तुलनेत चार लाखांनी उत्पन्न वाढले आहे. अर्थात महापालिकेच्या वतीने ४७० गाळ्यांचे लिलाव करताना सरकारी दरानुसार महापालिकेला ७२ लाख ८४ हजार ७०० रुपयांचे उत्पन्न अपेक्षित होते. प्रत्यक्षात मात्र २९ लाख रुपयांचेच उत्पन्न मिळाले आहे.प्रतिसाद नाहीमहापालिकेच्या वतीने यंदा फटाक्यांच्या गाळ्यांसाठी चांगल्या जागा निवडण्यात आल्या होत्या, मात्र त्यापैकी ७० जागांवर पोलीस प्रशासनाने फुली मारली काही गाळ्यांना प्रतिसाद मिळाला नाही. अन्यथा उत्पन्न आणखी वाढण्याची शक्यता होती, असे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले.
मनपाला दिवाळीआधीच लक्ष्मी प्रसन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 12:48 AM