नाशिक : आर्थिक वर्षाचे अखेरचे दोन दिवस शिल्लक असल्याने सर्वच शासकीय कार्यालयात इष्टांकपूर्तीसाठी जोर लावला असून, कारवाईच्या भीतीने तसेच प्रलंबित रक्कम देऊन खाते क्लोज करायचे असल्याने कोट्यवधी रुपयांची उलाढाल बॅँका आणि शासकीय कार्यालयात झाली. जिल्हा प्रशासनाला विविध प्रकारच्या महसूलला एकाच दिवसात २४ कोटी रुपये मिळाले आहेत. तर महापालिका तसेच अन्य शासकीय विभागांनीदेखील कोट्यवधी रुपयांची कमाई केल्याने त्यांना लक्ष्मी प्रसन्न झाली आहे.कोशागार कार्यालयातून आत्तापर्यंत ११०० कोटी रुपयांची देयके देण्यात आली असून, दोन दिवसांत शंभर कोटी रुपये अदा करण्यात आले आहेत. रविवारी (दि. ३१) साप्ताहिक सुट्टीचा दिवस असला तरी बहुतांशी शासकीय खाते, बॅँका तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालये सुरूच असणार आहेत.मार्चअखेरीस शासकीय बिलांसाठी कोशागार कार्यालयाकडे विशेष लक्ष असते. परंतु गेल्या काही वर्षांत आॅनलाइन पेमेंट आणि अन्य कारणांमुळे पूर्वीप्रमाणे रात्रभर या कार्यालयात कामकाज चालत नाही. यंदा १ मार्चपासून आत्तापर्यंत ९ हजार बिले कोशागारात दाखल झाली होती. त्यानुसार ११०० कोटी रुपयांची बिले देण्यात आली आहेत. दोन दिवसांत शंभर कोटी रुपये देण्यात आले आहेत. शनिवार आणि रविवार या दोन दिवसांत आणखी पाचशे बिले सादर होण्याची शक्यता असून बिले वेळेवर देण्यासाठी कोशागार कार्यालयात पूर्णत: सज्जता आहे. जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी शनिवारी (दि.३०) कोशागार कार्यालयास भेट दिली.जिल्हा प्रशासनाला म्हणजेच महसूल विभागाला वार्षिक १६५ कोटी रुपयांचे महसूल वसुलीचे उद्दिष्ट होते. त्यापैकी १६१ कोटी रुपये शनिवारी (दि. ३०) सायंकाळपर्यंत उपलब्ध झाले होते. त्यात चोवीस कोटी रुपये शनिवारी एकाच दिवसात मिळाले आहे. त्यात भाम धरण भूसंपादनाच्या आस्थापना खर्चापोटी ४ कोटी रुपये, समृद्धी मार्गाच्या भूसंपादनाच्या आस्थापना खर्चापोटी १ कोटी ४८ लाख, सिन्नर एमआयडीसीच्या खर्चापोटी ३ कोटी १० लाख तसेच इतर स्वामित्वधन ११ कोटी अशा विविध मार्गांतून २४ कोटी रुपये मिळाले आहेत. याशिवाय रविवारी (दि. ३१) अखेरच्या दिवशी पाच कोटी रुपयांपर्यंत उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे.
मार्चअखेरीस शासकीय विभागांवर लक्ष्मी प्रसन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 1:29 AM