या भागामध्ये निलेश गडाख यांनी नव्यानेच शिवकृपा ट्रेडर्स दुकान सुरू केले आहे. मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडून व शटर वाकवून दुकानातील महागड्या किमतीच्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या विद्युतमोटरी, घरघंट्या व किरकोळ वस्तू लांबविल्या. अज्ञात चोरट्यांनी शटर वाकवून आधी बाहेर सुरू असणारा विद्युतपुरवठा बंद केला, त्यानंतर दुकानातील सर्व वस्तू चारचाकी वाहनातून पळवून नेल्याचा अंदाज आहे. या ठिकाणी चारचाकी वाहनाच्या टायरच्या खुणा दिसून आल्या आहेत. शेजारी राहणारे रामदास सानप यांना पहाटेच्या सुमारास दुकानाचे शटर उघडे असल्याचे दिसले. आत पाहिले असता दुकानाचे सामान चोरट्यांनी चोरून नेल्याचे लक्षात येताच त्यांनी गडाख यांना दूरध्वनीवरून ही माहिती दिली. त्याचप्रमाणे या दुकानाशेजारी असणारे लक्ष्मी ॲग्रो या दुकानाचेही शटर तोडण्याचा चोरट्यांनी अयशस्वी प्रयत्न केला. मात्र सेंटर लॉक असल्याने चोरट्यांचा डाव फसला. हा प्रकार सकाळी लक्षात आल्यानंतर नांदूर पोलीस दूरक्षेत्रात याबाबत माहिती देण्यात आली. पोलिसांनी पंचनामा केला असून, या गुन्ह्याचा तपास वावी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार प्रवीण अढांगळे करीत आहेत. (०७ नांदुरशिंगोटे)
--------------
परिसरात गस्त वाढविण्याची मागणी
नांदूरशिंगोटे परिसरात पुन्हा चोरट्यांनी आपला मोर्चा वळविला आहे. यापूर्वी या परिसरात एकाच रात्रीत पाच ते दहा दुकाने फोडून मोठी लूट चोरट्यांनी केली होती. एक वर्षाचा कालावधी जात नाही तो पुन्हा हा प्रकार घडल्याने व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिसरात रात्रीच्या वेळेस पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
===Photopath===
070121\07nsk_6_07012021_13.jpg
===Caption===
०७ नांदूरशिंगोटे