सायखेडा : औरंगपूर गावाच्या मध्यवर्ती असलेल्या गल्लीतील ज्ञानेश्वर खालकर यांच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने जवळपास दीड तोळ्याचा राणीहार, दीड तोळ्याचा नेकलेससह ८५ हजार रुपयांची चोरी करून पोबारा केला. चोरट्याचा शोध घेण्यासाठी श्वान पथकाला पाचारण करूनही अपयश आले. पोलिसांकडून शोध घेणे सुरू आहे.औरंगपूर येथील ज्ञानेश्वर खालकर हे गावात श्रीराम मंदिराच्या पाठीमागे राहतात. त्यांचे इतर कुटुंब शेतात वास्तव्याला आहे. त्यांच्या बहिणीचे लग्न असल्यामुळे ते स्वतः, पत्नी व एक मुलगा शेतातील घरी पुऱ्यांच्या कार्यक्रमाला गेले होते, रात्री उशीर झाल्यामुळे ते गावातील घरी न परतता मळ्यातच मुक्कामाला थांबले. अज्ञात चोरट्याने घरात कोणी नाही, सगळे शेतात गेले आहे हे हेरओ आणि रात्रीच्या सुमारास दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला.
घरातील सर्व साहित्य अस्ताव्यस्त करून डब्यात ठेवलेला दीड तोळ्याचा राणीहार आणि दीड तोळ्याचा नेकलेस तसेच रोख ८५ हजार रुपयांची रक्कम घेऊन पोबारा केला. सकाळी घरी येऊन पाहिल्यानंतर खालकर यांच्या सर्व प्रकार लक्षात आला. सायखेडा पोलीस ठाण्यात कळवून पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ तांबे यांनी भेट देऊन पाहणी केली.
तपासाला दिशा मिळावी, यासाठी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने माग काढण्याचा प्रयत्न केला, मात्र ठरावीक अंतरानंतर श्वान पुढे जाऊ न शकल्याने अडचणी आल्या. चोरी करणारा माहितीतील असावा, त्यानेच पाळत ठेवून डल्ला मारल्याचा पोलिसांना संशय आहे. अज्ञात चोरट्यांविरोधात भादंवि ४५७ व ३८० अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला.