संजय शहाणे ल्ल इंदिरानगरवडाळागाव तसेच आजूबाजूच्या परिसरात काही दलाल आणि कथित बांधकाम व्यावसायिक गुंठेवारी पद्धतीने जागाविक्री करीत असून, त्यातून जमीन खरेदी करणाऱ्यांची फसवणूक होत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. जमीन खरेदी करूनही खरेदी करणाऱ्याकडे जमिनीची मालकी नसल्याने अनेकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला आहे. वडाळागाव तसेच परिसरातील अनेक शेतीपट्ट्यात बिनशेती म्हणून जमीन विक्री केली जात असून, त्यातून ग्राहकांची फसवणूक होत आहे. परिसरात थोड्याफार प्रमाणात अजूनही शेती आहे. मात्र बहुतांश भागाज प्लॉट पडले आहेत. काही दलाल अशा प्रकारच्या जमिनी हेरून मूळ मालकाला हाताशी धरून ग्राहकांची फसवणूक करीत आहेत. बाजारभावापेक्षा कमी दरात जमिनीची विक्री होत असल्याने जमीन घेणाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केलेली आहे. मात्र त्यांची फसवणूक झाल्याचे एकेक प्रकरण उजेडात येत आहे. गुंठेवारी प्लॉट घेतल्यामुळे जमीन घेणाऱ्यांच्या नावावर नोंदणी जात नाही. शिवाय सदर जमीन ही दुसऱ्यालाही विक्री करता येत नाही. अशा प्रकारे असंख्य ग्राहकांची फसवणूक झाली असून, अनेकांनी याप्रकरणी पोलिसांकडे धावही घेतली आहे. काही ठिकाणी तर अक्षरश: शेतीपट्ट्यात तारेचे कुंपण घालून प्लॉट पाडण्यात आलेले आहेत. याकामी दलाल ग्राहकांना अडकवत असून, त्यांची फसवणूक करीत आहेत. अनेक ठिकाणी तर ग्राहकांकडून आगाऊ पैसे घेण्यात आल्यानंतर संबंधित दलालाने पुन्हा तोंडही दाखविले नसल्याची तक्रार समोर आलेली आहे. याचाच अर्थ काही दलाल हे कुणाच्याही जमिनी दाखवून त्या गुंठेवारी पद्धतीने देण्याचे आमिष दाखवून लुबाडणूक करीत आहे. फसवणूक झालेल्यांनी या प्रकरणी आज ना उद्या न्याय मिळेल म्हणूनही अनेक लोक गप्प बसलेले आहेत. परंतु लोक समोर आल्यास यातून फसवणुकीचा मोठा प्रकार समोर येण्याची शक्यता आहे.
जमीन घेणाऱ्यांची होतेय फसवणूक
By admin | Published: October 26, 2015 11:23 PM