संदीप भालेराव,नाशिक : भद्रकालीतील अवैध व्यवसाय सुरू असून रात्री-अपरात्री बार, रेस्टॉरंट सुरू असतात. बाईकच्या मागच्या सीटमध्ये ड्रग्ज ठेवले जात असल्याचे व्हिडीओ आपल्याकडे आहेत. भद्रकालीतील बेकायदेशीर अतिक्रमण हा लॅन्ड जिहादचा प्रकार असून याप्रकरणी प्रसंगी हिंदू संघटनांकडून जनआंदोलन उभारले जाईल. खुर्ची टिकवायची असेल तर नुसते दाढ्या कुरवाळत बसू नका असा इशाराच नितेश राणे यांनी नाशिकमधील पत्रकार परिषदेत मनपा आयुक्तांना दिला.
नाशिकरोड येथील साने गुरुजी शिक्षण मंडळाच्या कार्यक्रमासाठी राणे नाशिकमध्ये आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. बडगुजर प्रकरणावर बोलण्यास त्यांनी नकार दिला. हे प्रकरण एसआयटीकडे आहे. त्यामुळे त्याच्यावर आत्ता काही बोलणार नाही. मात्र यासाठी नाशिकमध्ये येऊनच स्वतंत्र पत्रकार परिषद घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. नाशिकमध्ये सामाजिक तेढ निर्माण होत आहे. भद्रकालीत अनधिकृत भोंगे, अवैध व्यवसाय, अतिक्रमण वाढले आहे. नियम केवळ हिंदूंनाच आहे असे नाही तर सर्वांनीच नियम पाळले पाहिजेत असे राणे म्हणाले.
राममंदिरात उद्धव ठाकरेंचे कोणतेही योगदान नाही. त्यामुळे त्यांना निमंत्रण द्यायचा प्रश्न नाही. संजय राऊत यांनी तर त्यावर काही बोलूच नये. लोकप्रभामध्ये त्यांनी त्यावेळी राममंदिराच्या विरोधात लेख लिहिला होता, संजय राऊत कायम नाईंटी मारून बोलत असतात. दौऱ्यावर असताना त्यांची ब्रेथ ॲनालायझरद्वारे चाचणी घ्या असा असे राणे यावेळी म्हणाले.