नाशिक- कृषी माल आणि उत्पादनांच्या निर्यातीसाठी नाशिकला निफाड तालुक्यात ड्रायपोर्ट साकारण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्रीय शिपींग व पोर्ट मंत्री सर्बानंद सोनेावाल यांनी नियोजीत जागेच्या हस्तांतरणासाठी जेएनपीटीला सूचीत केले होते. त्यानुसार जेएनपीटीने नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना जमीन हस्तांतरणासाठी पत्र दिले आहे.
केंद्रशासनाच्या जवाहरलाल नेहरू बंदर प्राधीकरण म्हणजेच जेएनपीटीनीे सागरमाला उपक्रमाअंतर्गत नाशिकला निफाड तालक्यात ड्रायपोर्ट तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. बंद पडलेल्या निफाड सहकारी साखर कारखान्याची काही जागा त्यासाठी वापरण्यात येणार होती. मात्र त्यास वेगवेगळ्या आर्थिक कारणामुळे विलंब होऊ लागल्याने मध्यंतरी नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी हा प्रकल्प आपल्या मतदार संघात इगतपुरीत नेण्याची तयारी केली होती. मात्र, नंतर ड्रायपोर्ट निफाडलाच करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता या जागेच्या जमीन हस्तांतरणामुळे प्रकल्पाला गती मिळणार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री डॉ. भारती पवार यांनी दिली.