नाशिक : महावितरणने अघोषित भारनियमन सुरू केल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी शहर राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने महावितरणच्या कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शने करून शहर अभियंत्यांना कंदील व मेणबत्त्यांची भेट देण्यात आली. सणासुदीच्या दिवसांत त्वरित भारनियमन मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल व त्याची जबाबदारी सरकारवर राहील, असा इशाराही यावेळी देण्यात आला.विशेष म्हणजे, राष्टÑवादीचे आंदोलन सुरू असताना महावितरणचे कार्यालयच संपूर्ण काळोखात बुडालेले असल्यामुळे कार्यालयाचे कामकाज ठप्प झाले, तर जनतेच्या तीव्र भावना लक्षात घेता पोलिसांनी कार्यालयाभोवती वेढा दिला. गेल्या दोन दिवसांपासून महावितरण कंपनीने शहर व परिसरात अघोषित भारनियमन सुरू केले असून, त्यामुळे जनजीवनावर परिणाम झाला आहे. दिवाळीसारख्या प्रकाशाच्या सणाच्या कालावधीत सुरू करण्यात आलेल्या भारनियमनामुळे व्यापारी व व्यावसायिकांनाही मोठा फटका बसत असून, उद्योगधंद्यांना तेजीच्या काळात मंदीचा सामना करावा लागत आहे. आॅक्टोबर हीटमुळे अगोदरच नागरिक उष्णतेने घामाघूम झालेले असताना त्यात विजेच्या लपंडावाने आणखीनच भर पडली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शुक्रवारी दुपारी शहर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष रंजन ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महावितरणच्या शिंगाडा तलाव येथील कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शने करण्यात आली.त्यानंतर शहर अभियंता तायडे यांची शिष्टमंडळाने भेट घेऊन निवेदन सादर केले. त्यात म्हटले आहे की, राज्यात पुरेशी वीज आहे त्यामुळे नाशिक शहरात भारनियमन होणार नाही असे महावितरणने जाहीर केलेले असतानाही विजेच्या तुटवड्याचे कारण दाखवून नाशिककरांना काळोखात लोटण्यात आले आहे. भारनियमनामुळे शहरातील व्यापार व उद्योगाला कोट्यवधीचा फटका बसत आहे. विद्यार्थ्यांचा परीक्षेचा कालावधी सुरू असून, अभ्यासासाठी कंदील व मेणबत्तीचा आधार घ्यावा लागत आहे. या सर्व गोष्टी विचारात घेऊन शहरातील भारनियमन त्वरित रद्द करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी शहर चिटणीस संजय खैरनार, गौरव गोवर्धने, प्रशांत खरात, डॉ. अमोल वाजे, अॅड. सुरेश आव्हाड, डॉ. चिन्मय गाढे, सुनील महाले, अशोक मोगल पाटील, शंकर मोकळ, मकरंद सोमवंशी, यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
राष्टÑवादीकडून ‘कंदील’ भेट !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2017 1:38 AM