नाशिक - भीमा-कोरेगावच्या घटनेच्या निषेधार्थ काही संघटनांनी दिलेल्या महाराष्ट बंदचा परिणाम नाशिकमध्येही हळूहळू दिसून येऊ लागला असून बंदच्या पार्श्वभूमीवर शहरात सर्वत्र मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. काही खासगी शाळांनी सुट्टी जाहीर केली असून शालेय वाहतुकीवरही परिणाम दिसून येत आहे. दरम्यान, शहरातील मध्यवर्ती भागात असलेला शालिमार ते सीबीएस हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.भारिप बहुजन महासंघासह विविध संघटनांनी आज महाराष्ट बंदची हाक दिलेली आहे. या बंदच्या पार्श्वभुमीवर आज पहाटेपासूनच पोलिसांनी विविध चौक, प्रमुख रस्ते यांचा ताबा घेतला आहे. शहरातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या मेनरोड, शिवाजीरोड परिसरात व्यावसायिकांनी दुकाने उघडलेली नाहीत. शहर बससेवा सुरळीत असली तरी खासगी वाहने रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर दिसून येत नाही. शहरातील पुणे महामार्गावरील आयनॉक्स या चित्रपटगृहातील सर्व शो रद्द करण्यात आले आहेत. कॉलेजरोड, गंगापूररोड परिसरात शांतता आहे तर पोलिसांच्या गाड्या ठिकठिकाणी गस्त घालताना दिसून येत आहेत. सातपूर परिसरातही काही व्यावसायिकांनी बंद ठेवला आहे तर बंदचा औद्योगिक क्षेत्रावर मात्र फारसा परिणाम दिसून आलेला नाही. मेरी-म्हसरुळ परिसरात काही कार्यकर्त्यांनी व्यावसायिकांना दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन करण्यास सुरुवात केली आहे तर नाशिकरोड परिसरात शांतता आहे.
बंदच्या पार्श्वभूमीवर नाशकात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2018 10:53 AM
काही शाळांना सुट्टी, वाहतुकीवर परिणाम
ठळक मुद्देमध्यवर्ती भागात असलेला शालिमार ते सीबीएस हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंदपोलिसांनी विविध चौक, प्रमुख रस्ते यांचा ताबा घेतला आहे