देवळाली कॅम्प : देवळाली कॅम्पमधील वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होत असतानाच कॅन्टोन्मेंट बोर्डाने यावर महत्त्वपूर्ण निर्णय घेत येत्या १५ मार्चपासून सम-विषम पार्किंग व्यवस्था करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यावेळी झालेल्या चर्चेत वाहतूक समस्येबरोबरच हॉस्पिटल, जॉगिंगट्रॅक, ग्रीनजीम, आधारकार्ड केंद्र, घरपट्टी व आगामी वर्षांत करावयाच्या १५ कोटी रुपयांच्या खर्चास मंजुरी देण्यात आली.ब्रिगेडिअर पी. रमेश यांच्या अध्यक्षतेखाली बोर्डाची सभा झाली. यावेळी मागील सभेतील विषयांचा आढावा घेताना वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस जटिल होत असल्याने यावर तोडगा काढण्याबाबत चर्चा झाली. कॅम्पमध्ये सम आणि विषम तारखांना पार्किंग सुविधा करण्याबाबतचा निर्णय यावेळी घेण्यात आला. त्यानुसार हौसनरोड, मेनस्ट्रिट, मिठाई स्ट्रिट व वडनेररोड या महत्त्वाच्या रस्त्यांवर सम-विषम प्रकारात दुचाकी पार्किंगची व्यवस्था केली जाणार आहे. चारचाकीसाठी आठवडे बाजार, पोलीस स्टेशनलगत, कॅन्टोन्मेंट कार्यालयासमोर व सायली मेडिकलमागील मोकळ्या मैदानात व्यवस्था करण्यात आली आहे. पार्किंगचे नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. ही व्यवस्था १५ मार्चपासून सुरू होणार आहे. तत्पूर्वी ५ मार्च रोजी बोर्ड सदस्य व प्रशासनाधिकारी यांचा संयुक्त पाहणी दौरा होणार आहे.ग्रीन जिम व इनडोअर जिम यांना दहा लाख रु पये खर्चाच्या कामाला मंजुरी देण्यासह हॉस्पिटलमध्ये डायलेसिस युनिटसाठी स्वतंत्र कक्ष व पार्किंग सुविधांना मंजुरी देण्यात आली. याशिवाय हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारासमोरील पार्किंगचे स्थलांतर रक्तपेढीच्या शेजारी करण्याचा निर्णय घेण्यात आला. आगामी वर्षात शहरातील सर्व रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी अडीच कोटी, शाळा दुरुस्ती २५ लाख, कार्यालय, हॉस्पिटल व कॅन्टोन्मेंट इमारत दुरुस्तीसाठी दीड कोटी, पंपिंग स्टेशन, फिल्टरेशन प्लॅण्ट व नाले यासाठी ५० लाख, इतर महत्त्वाच्या बाबींसाठी असे एकूण १५ कोटींच्या कामांना मंजुरी देण्यात आली.सभेस उपाध्यक्ष प्रभावती धिवरे, नगरसेवक बाबूराव मोजाड, दिनकरराव आढाव, सचिन ठाकरे, भगवान कटारिया, कावेरी कासार, आशा गोडसे, सीईओ अजय कुमार, नियुक्त सदस्य कर्नल कमलेश चौहान, ले.कर्नल अजयकुमार आदी उपस्थित होते.करवाढीवर निर्णय घेण्यासाठी विशेष सभा होणारकरवाढीबाबत रहिवाशांमध्ये असंतोष असल्याने त्याबाबत बोर्डाच्या सहमतीने निर्णय घ्यावा, अशी मागणी नगरसेवक सचिन ठाकरे, बाबूराव मोजाड, दिनकर आढाव व कावेरी कासार यांनी केली असता या संदर्भात विशेषसभा बोलावून निर्णय घेणार असल्याचे अध्यक्षांनी सांगितले. आनंदरोड मैदानावर उभारण्यात येत असलेल्या जॉगिंग ट्रॅकसाठी २६ लाखांचा निधी मंजूर करण्यासह या ठिकाणी विशिष्ट पोल व ध्वनिव्यवस्था असावी याबाबत उपाध्यक्ष प्रभावती धिवरे व सचिन ठाकरे यांनी केलेली सूचना मान्य करण्यात आली.
आरोग्य, वाहतूक नियोजनासाठी मोठी तरतूद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 12:48 AM