खड्डयांमुळे वाहतुकीस अडथळा
नाशिक : शहरातील विविध भागांमध्ये अनेक कामांसाठी रस्ते खोदल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. अनेक ठिकाणी अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. काही ठिकाणी अनेक महिन्यांपासून खड्डे खोदलेले आहेत. ही कामे त्वरित पूर्ण करावीत, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईची मागणी
नाशिक : शहरातील विविध सिग्नलवर वाहतूक पोलीस नसल्याने बेशिस्त वाहनचालक सिग्नलवर वाहन न थांबविता भरधाव वेगाने वाहने पुढे नेतात. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून, अनेकवेळा वाहतूक कोंडी होते. बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
टवाळखोरांमुळे पर्यटक त्रस्त
नाशिक : गोदाघात परिसरात येणारे पर्यटक टवाळखोरांकडून होणाऱ्या त्रासामुळे त्रस्त झाले आहेत. पर्यटकांचे सामान चोरणे त्यांना विविध मार्गाने त्रास देणे असे प्रकार राजरोस सुरू असल्यामुळे पर्यटकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी अशा टवाळखोरांवर कारवाई करावी अशी मागणी गोदाघात परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.
रविवार कारंजा अतिक्रमणाच्या विळख्यात
नाशिक : शहरातील रविवार कारंजा अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला असून, यामुळे वाहतुकीची कोंडी होते. कारंजाच्या भोवती बसणारे विक्रेते, या ठिकाणी थांबणाऱ्या रिक्षा, हातगाडीवाले यामुळे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. परिणामी या परिसरात नेहमीच वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी करण्यात येत आहे.
रस्त्यावर पडलेले खांब धोकादायक
नाशिक : जिल्हा रुग्णालयासमोर काढून ठेवलेले जुने विद्युत खांब धोकादायक ठरू लागले आहेत. या ठिकाणी रात्रीच्यावेळी अंधाराचे साम्राज्य असते यामुळे वाहनचालकांना अंदाज येत नाही. विशेषत: दुचाकी चालकांचा अधिक गोंधळ होतो. यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे खांब या ठिकाणाहून हलवावेत, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे.
वाढत्या थंडीमुळे शेतकरी चिंतित
नाशिक : गेल्या काही दिवसांपासून थंडीत वाढ झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. थंडीमळे गहू, द्राक्ष या पिकांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात असल्याने शेतकरी धास्तावले आहेत.