नाशिक : जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत सोमवारी (दि. १०) एकूण १८३५ रुग्णांची वाढ झाली, तर २८८३ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. दरम्यान, शुक्रवारी ३२ नागरिकांचा बळी गेल्याने एकूण बळींची संख्या ३९८७ वर पोहोचली आहे.
जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रामध्ये ९७३, तर नाशिक ग्रामीणला ८१८ आणि मालेगाव मनपा क्षेत्रात २५ व जिल्हाबाह्य १९ रुग्ण बाधित आहेत, तर जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रात ०७, ग्रामीणला २५ असा एकूण ३२ जणांचा बळी गेला आहे. गत बुधवारपासून पुन्हा मृतांच्या आकड्याने चाळिशीवरील वाढ कायम ठेवली होती; मात्र आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बाधित संख्या काहीशी कमी झाल्याने आरोग्य यंत्रणेला अल्पसा दिलासा मिळाला आहे.
इन्फो
उपचारार्थी ३२ हजारांवर
जिल्ह्यात कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या बाधितांच्या समकक्ष आली आहे, त्यामुळे सध्या उपचार घेत असलेल्या एकूण उपचारार्थी रुग्णांची संख्या ३२,०९५वर पोहोचली आहे. त्यात १४ हजार ४८० रुग्ण नाशिक मनपा क्षेत्रातील, १५ हजार ७४८ रुग्ण नाशिक ग्रामीणमधील, एक हजार ५१९ मालेगाव मनपा क्षेत्रातील, तर जिल्हाबाह्य ३४८ रुग्णांचा समावेश आहे.
इन्फो
कोरोनामुक्तचे प्रमाण ९० टक्क्यांनजीक
जिल्ह्यात कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येत थोडी वाढ होऊन ते प्रमाण ९० टक्क्यांवर पाेहाेचले आहे. त्यात जिल्हाबाह्य रुग्णांचा दर ९१.१८ टक्के, नाशिक शहर ९२.३२, नाशिक ग्रामीण ८६.५२, तर मालेगाव मनपाचा कोरोनामुक्तीचा दर ८४.९९ टक्क्यांवर पाेहोचला आहे.