नाशिक : बनावट मुद्रांकाद्वारे शेतजमीनीचा बोगस व्यवहार झाल्याचा प्रकार देवळा तालुक्यात समोर आल्यानंतर अशा प्रकारे फसवणूक झाल्याच्या असंख्य तक्रारी आता मुद्रांक विभागाला प्राप्त होत आहेत. याशिवाय दुय्यम निबंध कार्यालयात बनावट मुद्रांकाद्वारे नोंदी झाल्याचा संशय असल्याने जिल्ह्यात फसवणुकीची मोठी व्याप्ती असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सुमारे ४० हजार दस्त तपासण्यात येणार आहेत.
बनावट मुद्रांकाच्या आधारे शेतजमीनीचे बोगस व्यवहार झाल्याची बाब समेार आल्यानंतर महसूल आणि मुद्रांक विभाग खडबडून जागे झाले आहे. शासनाने डिसेंबर अखेर तीन टक्के सवलत दिल्याने खरेदी-विक्रीच्या व्यवहारात मोठी वाढ झाली होती. या काळातच देवळा येथील बनावट मुद्रांकांद्वारे शेतजमिनीचा बोगस् व्यवहार झाल्याचा प्रकार समोर आल्याने त्यादृष्टीने मुद्रांक विभागाने तपास सुरू केला आहे. यासाठी मुद्रांक आणि महसूल विभागाने संयुक्तरित्या तपास मोहिम हाती घेतली असून त्यासाठी बारा पथके स्थापन करण्यात आलेले आहेत. या कालावधीत सुमारे ४० हजार दस्त झाले असून या सर्वांचीच तपासणी केली जाणार आहे.
देवळा तालुक्यातील प्रकरण समोर आल्यानंतर अशा प्रकारच्या फसवणुकीबाबतच्या तक्रारी महसूल आणि मुद्रांक विभागाला देखील प्राप्त होत आहेत. याशिवाय दुय्यम निबंधक कार्यालयातील एकुणच कामकाज पाहाता या कार्यालयांमध्ये झालेल्ाय व्यवहारांची देखील तपासणी केली जाण्याची शक्यता आहे. तपासण्यात येणाऱ्या दस्त नोंदणीबाबत शंका आल्यास अशा प्रकरणांचा सखोल तपास केला जाणार आहे. आतापर्यंत २४१ दस्त तपासण्यात आले आहेत. याबाबतचा तपासणी अहवाल अद्याप प्राप्त झालेला नसून अहवालानंदर संशयास्पद प्रकरणांची चौकशी केली जाणार आहे.
जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहरात घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांमुळे अशा व्यवहारांमध्ये कितपत पारपदर्शकता असू शकते याविषयी सर्वसामान्यांमधून संशय नेहमीच व्यक्त केला जातो. आता थेट तक्रारी प्राप्त होत असल्याने अनेक गैरमार्गने व्यवहार झाले असल्याची शक्यता असल्याने जिल्ह्यात बनावट मुद्रांकाची व्याप्ती देखील मोठी असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. देवळा प्रकरणातील संबंधित मुद्रांक विक्रेत्याचा परवाना रद्द करण्यात आलेला आहे. मात्र अद्याप चौकशी पूर्ण झालेली नसल्याने संशियत ताब्यात आल्यानंतर यातील अनेक प्रकरणे समोर येण्याची देखील शक्यता आहे.