नाशिक : राज्यात जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी करून किमती वाढविल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त होत असून, त्या तक्रारींची दखल घेऊन राज्यात पथके गठित करण्यात आल्याची माहिती राज्याचे अन्न व पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहेत.जीवनावश्यक वस्तूंची कोणतीही टंचाई नसून किराणा दुकानांमधून वस्तूंचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी शासन यंत्रणा खबरदारी घेत आहे. मात्र सध्या लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर काही व्यापाऱ्यांकडून वस्तूंचा काळाबाजार व अतिरिक्त भाववाढ केली जात आहे. राज्याच्या वैधमापन शास्त्र विभागाने जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी व भाववाढ नियंत्रित करण्यासाठी पथके तयार केली आहेत. ही पथके किरकोळ तसेच घाऊक व्यापार प्रतिष्ठाने, गुदामे, शीतगृहे इत्यादी ठिकाणी असलेल्या जीवनावश्यक वस्तूंची उपलब्धता व दरांची पडताळणी करून कारवाई करणार आहे. जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी किंवा चढ्या दराने विक्री केल्यास सात वर्षांपर्यंत कैद होऊ शकते. याबाबत पुरवठा विभागासोबतच महसूल विभाग आणि वैधमापनशास्त्र विभाग व पोलीस यांना संयुक्त कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
साठेबाजी रोखण्यासाठी राज्यात भरारी पथके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2020 11:55 PM