लोकमत न्यूज नेटवर्कलासलगाव : येथील बसस्थानकावरून शनिवारी (दि.२९) दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास निघालेली लासलगाव-चांदवड बस वाळकेवाडी फाट्यावर मुरमाड जागेवरून घसरून रस्त्यालगतच्या नालीत उलटल्याने या अपघातात बसमधील १५ ते २० प्रवासी किरकोळ जखमी झाले. प्रवाशांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या अधिक होती.लासलगाव बसस्थानकावरून लासलगाव ते उर्धूळ मार्गे चांदवड ही बस (क्र . एमएच १२, सीएस ७५५८) पिंपळद गावाकडे जात असताना वाळकेवाडी फाट्यावर रस्त्यावरील मुरमाड जागेमुळे घसरली आणि रस्त्यालगतच्या लहान नाल्यात जाऊन उलटली. बसमध्ये बव्हंशी विद्यार्थी प्रवास करीत होते. बस उलटल्यानंतर प्रवाशांनी आरडाओरडा केला. या अपघातात काही प्रवाशांना मुका मार लागला तर काही किरकोळ जखमी झाले. प्रवाशांमध्ये चांदवडचे लोकमत प्रतिनिधी महेश गुजराथी तसेच ज्येष्ठ पत्रकार काकासाहेब कोतवाल यांनाही मुका मार लागला. अपघाताची माहिती मिळताच लासलगाव बसआगाराचे प्रमुख एस. एन. शेळके यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली आणि प्रवाशांना सोबत आणलेल्या बसने चांदवड येथे रवाना केले. सदर बस सरळ करून दुपारी अडीच वाजता आगारप्रमुख एस. एन. शेळके यांनी लासलगाव बस आगारात परत आणली. यामध्ये बसचे देखील किरकोळ नुकसान झाले आहे.
लासलगाव-चांदवड बस उलटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2020 3:01 PM
वाळकेवाडी फाट्याजवळ अपघात : प्रवासी किरकोळ जखमी
ठळक मुद्दे या अपघातात काही प्रवाशांना मुका मार लागला तर काही किरकोळ जखमी झाले.