जिल्ह्यातील कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भाव विचारात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी दि. १२ मे ते २३ मे या कालावधीत कडक निर्बंधांची अंमलबजावणी करून सर्व बाजार समित्यांचे शेतीमाल लिलावाचे कामकाज बंद केले होते. त्यानंतर दि. २४ मेपासून जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांचे लिलावाचे कामकाज पूर्ववत सुरू झाले. दि. २४ मे २० जून २०२१ या कालावधीत लासलगाव बाजार समितीच्या मुख्य आवारासह निफाड व विंचूर उपबाजार आवारात ११ लाख ४३ हजार १४१ क्विंटल कांद्याची विक्रमी आवक होऊन १७१ कोटी ४७ लाख ५०० रुपये इतक्या रकमेची उलाढाल झाली आहे.
मागील वर्षी या कालावधीत बाजार समितीच्या लासलगाव मुख्य, निफाड व विंचूर उपबाजार आवारांवर ६ लाख २५ हजार ७४७ क्विंटल कांद्याची आवक होऊन ५० लाख १८ हजार ९४ इतक्या रकमेची उलाढाल झाली होती. त्याचप्रमाणे या कालावधीत मागील वर्षापेक्षा सध्याच्या सरासरी बाजारभावात देखील ७०० रुपयांनी वाढ झाली आहे.
सद्यस्थितीत कांद्याचे सरासरी बाजारभाव स्थिर असून शेतकरी बांधवांनी त्यांचा कांदा हा शेतीमाल योग्य प्रतवारी करून बाजार आवारावर विक्रीस आणावा, असे आवाहन बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप यांनी केले आहे.
इन्फो
गुरुवारपासून डाळिंब लिलाव
लासलगाव बाजार समितीत गुरुवार, दि. २४ जूनपासून डाळिंब लिलावास सुरुवात होणार आहे. लासलगावसह परिसरातील निफाड, चांदवड, येवला, सटाणा, देवळा, कळवण, मालेगाव, सिन्नर, कोपरगाव, राहुरी, राहाता व नेवासा तालुक्यांतील गावांमध्ये शेतकऱ्यांनी डाळिंब या शेतीमालाची मोठ्या प्रमाणावर लागवड केलेली असल्याने त्यांना मालविक्रीची सोय व्हावी म्हणून बाजार समितीतर्फे गेल्या सहा-सात वर्षांपासून डाळिंब लिलावास सुरुवात करण्यात आली आहे. डाळिंब खरेदीस इच्छुक असणाऱ्या व्यापाऱ्यांनी लायसेन्सबाबतच्या सर्व अटी पूर्ण केल्यास त्यांना तत्काळ परवाना देऊन पॅकिंग व साठवणुकीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सभापती जगताप यांनी सांगितले.