लासलगाव : आशिया खंडात कांद्याची अग्रेसर बाजारपेठ म्हणून नावलौकिक मिळवलेल्या लासलगांव कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरूवारी तब्बल पाऊण दशकानंतर अमावस्या दिनी कांदा लिलाव झाले. बाजार समितीत ८७१ वाहनांतील १६,८३३ क्विंटल उन्हाळा कांदा कमीत कमी ७७२ ते जास्तीत जास्त २३०० व सरासरी १८०१ रूपये भावाने विक्री झाला.
लासलगाव बाजार समितीत प्रथमच कांदा बाजारपेठ शेतकऱ्यांच्या गर्दीने आणि कांदा घेऊन आलेल्या वाहनांनी फुलून गेली होती. बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे व कर्मचारी तसेच व्यापारी, हमाल, कांदा उत्पादकांच्या गर्दीत उत्साहाचे वातावरण भारलेले होते. मुख्य कांदा बाजार आवारात प्रथमच अमावस्येच्या दिवशी परमपूज्य भगरी बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून कांद्याचे लिलाव करण्यात आले. ऐतिहासिक घटनेच्या निमित्ताने फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. पहिल्या वाहनातील कांदा २३०० रुपये इतक्या बाजार भावाने खरेदी करण्यात आला.
७५ वर्षांपासूनच्या परंपरेला फाटा
शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकारच्यावतीने प्रत्येक राज्यांमध्ये बाजार समितीची राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली स्थापना करण्यात आली. १ एप्रिल १९४७ मध्ये लासलगाव बाजार समितीची स्थापना करण्यात आली तेव्हापासून आजपर्यंत ७५ वर्षांपासून एक परंपरा अवलंबली जात होती. ती म्हणजे दर महिन्याला येणाऱ्या अमावस्येला कांद्याचे लिलाव बंद ठेवण्यात येत होते. या परंपरेला आता कृतीने छेद दिला आहे.
------------------------
लासलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत जास्तीत जास्त दिवस लिलावाचे कामकाज व्हावे याकरिता प्रयत्न करीत आहे. आता अमावस्येला लिलावाचे कामकाज वर्षात बारा दिवस वाढीव होणार असून किमान तीन ते चार लाख क्विंटल कांदा विक्री वाढणार आहे.
- नरेंद्र वाढवणे,सचिव , बाजार समिती लासलगाव (१० लासलगाव १)
===Photopath===
100621\10nsk_8_10062021_13.jpg
===Caption===
१० लासलगाव १