लासलगाव : आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ असलेल्या लासलगावने कोरोनामुक्तीचा अनोखा पॅटर्न राबविला आहे. लासलगाव एक डॉक्टर कोरोनाबाधित आढळल्यानंतर ग्रामपंचायत प्रशासनाने शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कार्यवाही केली. बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांना क्वॉरण्टाइन करत संसर्गाची साखळी तोडली, त्यातून गाव व परिसर कोरोनामुक्त झाला.लासलगावातील एक डॉक्टर येवला येथे रुग्णसेवेसाठी जात होते. त्यांना कोरोना संसर्ग झाला. त्यानंतर निफाडचे तहसीलदार दीपक पाटील यांच्या सूचनेनुसार ग्रामपंचायत प्रशासनाने डॉक्टरांकडे तपासणी केलेल्या सर्व रुग्णांची तातडीने माहिती मिळविली. लासलगाव परिसरातील ४८ स्त्री-पुरुषांनी संबंधित डॉक्टरांकडे तपासणी केल्याने ते त्यांच्या संपर्कात आले होते.कोरोनाची साखळी तोडण्यासाठी व त्यातील कोणाला संपर्क झालेला नाही ना, हे समजण्यासाठी सर्वांना क्वॉरण्टाइन करणे गरजेचे होते. त्यानुसार इमारतीची शोधाशोध सुरू झाली. ग्रामपंचायतीच्या मदतीला गावातील शिवसैनिक व महावीर जैन विद्यालयाचे चेअरमन सुनील आब्बड धावून आले. त्यांनी शाळेच्या जैन बोर्डिंगचे १० रूम व एक प्रशस्त हॉल सामाजिक बांधिलकीने तातडीने उपलब्ध करून दिला. क्वॉरण्टाइन केलेल्यांना काहीही अडचण येऊ नये यासाठी रूममध्ये फॅन लावण्यात आले. बेड, पलंग देण्यात आले. नाश्ता, जेवण व पिण्याच्या शुद्ध पाण्याची व्यवस्था करण्यात आली.विशेष म्हणजे यासाठी सरकारी तरतूद नसते. ग्रामपंचातयीला दानशूर व्यक्तींनी कोरोना प्रतिबंधासाठी दिलेल्या देणगीतून हा खर्च करण्यात आला. दोन दिवसांनी सर्वांचे स्वॅब घेण्यात आले. त्यात पाच जण पॉझिटिव्ह आढळले. त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू झाले, अशी माहिती ग्रामसेवक शरद पाटील यांनी दिली.कोरोना संसर्गाने आठ दिवस गावात एक घबराट पसरली. कृषी उत्पन्न बाजार समितीचे कामकाज थांबवून लिलाव बंद करण्यात आले. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली, मात्र दरम्यानच्या काळात रुग्ण बरे झाले. संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांचा क्वॉरंटाइनचा कालावधी संपला. त्यांच्यात कोणतीही लक्षणे जाणवली नाहीत. मात्र त्यांना काळजी घेण्यास सांगण्यात आले.कोरोनाची साखळी तुटल्याने गावातील व्यवहार हळूहळू पूर्वपदावर आले. विशेष म्हणजे बाजार समितीत कांदा लिलाव सुरू झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. आता रोज लासलगाव कांद्याची चांगली आवक होत आहे. गाव एकत्र आल्यावर सर्वांनी प्रशासनास साथ दिल्यानंतर कोरोनाची साखळी कशी तोडता येते, हे लासलगाव पॅटर्नने दाखवून दिले आहे.-------------------------गावात व्यवहार सुरू ठेवताना सर्व नियमांचे पालन केले जात आहे. बाहेरून कोणी आल्यावर त्याची रुग्णालयात तपासणी केली जाते. त्यांना होम क्वॉरण्टाइन केले जाते. गावात दवंडी पिटविली जाते. सकाळी १० ते संध्याकाळी सहा दुकाने सुरू झाली आहेत. क्वॉरण्टाइन करण्यात महावीर विद्यालयाची मदत महत्त्वाची ठरली.- शरद पाटील,ग्रामसेवक, लासलगाव