लासलगाव : कांदा निर्यातबंदीनंतर केंद्र शासनाने साठवणुकीवर निर्बंध घालण्याच्या निर्णयामुळे सोमवारी येथील बाजार समितीत कांद्याला कमी बाजारभाव जाहीर करण्यात आले. भाव कमी झाल्यानंतर कांदा उत्पादक संतप्त झाले व विचारणा करताच व्यापारी लिलावातून निघून गेले.त्यामुळे लासलगावचे लिलाव सकाळी पाच ते सहा वाहनातील लिलाव पुकारण्यात आल्यानंतर बंद पडले. सोमवारी सकाळी व्यापारी वर्गाची बैठक झाली. त्यात सुरू झालेल्या लिलावात ३००० ते ३३०० रूपये इतका कमी भाव जाहीर झाला. शुक्र वारी बाजार समितीत ६८७ वाहनातील लिलाव किमान ११०० ते कमाल ३८८० व सरासरी ३६०० रूपये भावाने झाले होते. कमाल भावात सहाशे रूपयांची घसरण झाली तर सरासरी भावही सहाशे रूपयांनी कमी झाला . त्यामुळे संतप्त शेतकरी वर्गाने बाजार समिती प्रवेशद्वाराजवळ धाव घेत लासलगाव - पिंपळगाव बसंवत रस्त्यावर ठिय्या मांडला त्यामुळे वाहतुक ठप्प झाली. त्यानंतर लासलगाव येथील पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी कांदा उत्पादकांची समजुत काढली. व त्यानंतर कांदा उत्पादक परत बाजार समतिीचे आवारात आले.काल सकाळी कांदा निर्यातबंदी लागु झाली व साठवणुकीची निर्बंधांचे निर्णयामुळे आता कांदा खरेदी करून खळ्यावर साठविण्याचे बाबत विचार विनीमय करण्याकरिता लासलगाव येथील कांदा खरेदीदार व्यापारी यांच्यात बैठक झाली. परंतु जिल्हा परिषद सदस्य डी .के .जगताप , लासलगाव मर्चंटस असोशिएनचे अध्यक्ष नंदकुमार डागा यांनी व्यापारी वर्गाशी चर्चा केली. त्यानंतर व्यापारी लिलावात आले. सकाळी तासभर लिलाव बंद होते. कांदा लिलावाचे कामकाज सुरू झाले.परंतू पाच ते सहा वाहनातील लिलावाचा पुकारा केवळ ३००० ते ३३०० रूपये भावाने झाला. त्यामुळे कमी भावाने उत्पादक हैराण झाले.त्यानंतर लिलावाचे कामकाज बंद पडले.ही घटना समजताच बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे , सुदिन टर्ले व पंकज होळकर, प्रकाश कुमावत यांनी नविन कांदा आवारात धाव घेतली परंतु लिलावाचे कामकाज बंद पडले. कांदा व्यापारी वर्गाचे कडील किरकोळ व्यापारी यांनी शंभर तर ठोक व्यापारी यांच्या करीता ५०० क्विंटल कांद्याची साठवणुकीची मर्यादा असल्याने आता साठवणुकीवर निर्बंधांचे चर्चेने व्यापारी वर्ग संभ्रमित झाला आहे.
लासलगावी भाव घसरल्याने कांदा लिलाव बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2019 1:09 PM