लासलगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात मंगळवारी शुकशुकाट दिसून आला. सकाळी लासलगाव पोलिसांनी जीपने जमावबंदीनंतर कोणी फिरताना आढळल्यास कारवाईचा इशारा देताच अनेक रस्त्यांवर फिरणारे नागरिक दिसेनासे झाले. सहायक पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे यांनी ध्वनिक्षेपकावरून नागरिकांना आवाहन केले.जीवनावश्यक वस्तू विक्र ी दुकाने वगळता इतर सर्व व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवली आहेत. त्यामुळे मुख्य रस्त्यासह लहान रस्त्यांवर किरकोळ नागरिक फिरताना दिसत आहे. सकाळी किराणा तसेच दूध विक्र ेते यांच्याकडे खरेदीकरिता लोकांची एकच गर्दी केली होती. लासलगाव बसस्थानकावरदेखील शुकशुकाट होता. रेल्वेस्थानकदेखील निर्मनुष्य झाले आहे.अमावास्या व बुधवारी गुढीपाडवा असल्याने लासलगाव बाजार समितीच्या शेतमालाचे लिलाव बंद राहणार आहेत. गुरुवारी शेतमालाचे लिलाव होतात की बंद होतात हे नंतर स्पष्ट केले जाणार आहे. लासलगाव बस आगारप्रमुख समर्थ शेळके यांनी दोन दिवसात एकही बस आगाराबाहेर न गेल्याने तीन दिवसात पंधरा लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे असे सांगितले. लासलगावचे सहायक पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे, पोलीस उपनिरीक्षक आर. एस. सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस गस्त सुरू आहे.
लासलगावी कांदा बाजारपेठ ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 5:08 PM