मालेगावी पाच केंद्रांद्वारे आरोग्य विभागातील ५०० कोरोनायोद्ध्यांना लसीकरण करण्यात आले. आशा सेविका शाहीन बी शेख या लसीकरणासाठी पहिल्या लाभार्थी ठरल्या. लसीकरणासाठी महापालिका व सामान्य रुग्णालयाची आरोग्य यंत्रणा सज्ज होती. शहरातील सोयगाव नागरी आरोग्य केंद्र ,रमजानपुर नागरी आरोग्य केंद्र ,कॅम्पातील निमा नागरी आरोग्य केंद्र व सामान्य रुग्णालयात लसीकरण करण्यात आले. प्रत्येक केंद्रावर शंभर आरोग्य कर्मचाऱ्यांची लसीकरणासाठी निवड करण्यात आली होती. शनिवारी दिवसभर लसीकरण मोहीम राबविण्यात आली. सकाळी ११ वाजेच्या सुमारास सोयगाव नागरी आरोग्य केंद्रावर मालेगाव शहराच्या पहिल्या लाभार्थी व रमजानपुरा आरोग्य केंद्राच्या आशा सेविका शाहीन बी शेख इकबाल यांना पहिली लस देण्यात आली. लसीकरण झाल्यानंतर त्यांना अर्धा तास नियंत्रण कक्षात ठेवण्यात आले. आरोग्य सेविका पुष्पा बैरागी, बालिका मते यांनीहे लसीकरण केले. अर्धा तास नियंत्रणात ठेवल्यानंतर लाभार्थी कुठलाही कुठल्याही प्रकारचा त्रास जाणवला नाही. त्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. यावेळी मनपा आयुक्त दीपक कासार, महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. सपना ठाकरे, आरोग्य कर्मचारी व आशा वर्कर उपस्थित होत्या. दरम्यान मालेगाव सामान्य रुग्णालयात कोविड लसीकरण केंद्राचे उद्घाटन करताना अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम यांच्या हस्ते करण्यात आले. या ठिकाणीअतिरिक्त शल्य चिकित्सक डॉ हितेश महाले यांना प्रारंभी लसीकरण करण्यात आले.
कोट.....
मालेगाव शहरात महापालिकेने चार नागरी आरोग्य केंद्र तसेच सामान्य रुग्णालयातील केंद्रात कोविशिल्ड लस उपलब्ध करून दिली आहे. शनिवारी पाचशे कर्मचाऱ्यांना लस दिली गेली. पहिल्या टप्प्यात चार हजार डोस उपलब्ध झाले असून १ हजार ९६० कर्मचाऱ्यांचे लसीकरण केले जाणार आहे. यासाठी १४५ आरोग्य कर्मचाऱ्यांना दोन टप्प्यात प्रशिक्षण देण्यात आले आहे.
- दीपक कासार,आयुक्त, मालेगाव मनपा
कोट....
रमजानपुरा आरोग्य केंद्रात आशा सेविका म्हणून मी काम करते. मी लसीकरणाची पहिली लाभार्थी ठरल्याने मला सार्थ अभिमान आहे. लस घेतल्यानंतर मला अर्धा तास नियंत्रण कक्षात ठेवण्यात आले. मला कुठल्याही प्रकारचा त्रास नाही. शहरवासीयांनीही लस घेऊन आपण कोरोनाला कायमचे हद्दपार करूया.
- शाहीन बी शेख, आशा सेविका