लासलगाव : लग्नसराईची दाट तिथी व त्यातच बाजार समितीत सध्या कांद्याची मोठ्या प्रमाणात होत असलेली आवक यामुळे गेले काही दिवस शहरातील सर्वच प्रमुख मार्गांवर वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. सकाळी दहा वाजेपासून ते दुपारी एक वाजेपर्यंत शहरात येणारे सर्व रस्ते बंद झाल्याने वाहनचालकांचे मोठ्या प्रमाणात अतोनात हाल झाले. लासलगाव पोलिसांनी या वाहतुकीकडे लक्ष देण्याची गरज आहे.तसेच बाजार समितीकडे जाणाऱ्या व डॉ. आंबेडकर रस्त्यावर सिग्नल व्यवस्था होण्याची गरज निर्माण झाली आहे. शहरात येणारा पिंपळगाव बसवंत रस्ता, विंचूर रस्ता तसेच येवला-पाटोदा रस्ता व चांदवड कडून येणारा रस्ता अशा चारही रस्त्यांवर बुधवारी सकाळी दहा वाजता मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. लग्नसराई असल्यामुळे वºहाडी मंडळींची कार्यालय स्थळापर्यंत पोहोचण्यासाठी मोठी धावपळ झाल्याचे वाहतूक कोंडीत पाहायला मिळाले.बाजार समितीकडे जाणाºया कोटमगाव रोड चौफुलीवर दोन ते तीन पोलीस कर्मचारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी भर उन्हात प्रयत्न करीत होते; मात्र वाहनांची संख्या लक्षात घेता त्यांचे प्रयत्न अपुरे पडत असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र ठिकठिकाणी पाहायला मिळाले.सध्या बाजार समितीत मोठ्या प्रमाणात उन्हाळ कांद्याची आवक होऊ लागली आहे, त्यामुळे पोलिसांनी योग्य ते नियोजन करून त्या ठिकाणी वाहतूक पोलीस तैनात करण्याची गरज निर्माण झालेली आहे.
लासलगावी वाहतूक कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 6:13 PM