नाशिक : ज्या व्यक्तींनी आपले मूळ उत्पन्न जाहीर केलेले नाही व त्यावरील आयकर भरलेला नाही अशा व्यक्तींसाठी ‘उत्पन्न जाहीर योजना-२०१६’ अखेरची संधी आहे. या योजनेअंतर्गत करपात्र उत्पन्न जाहीर करून त्यावरील आयकर भरावा. या योजनेअंतर्गत हप्त्याने रक्कम जमा करण्याची मुभा सरकारने दिली असल्याची माहिती नाशिक विभागाचे मुख्य आयकर आयुक्त ए. सी. शुक्ल यांनी पत्रकार परिषदेत दिली.‘उत्पन्न जाहीर योजना’ ही केंद्र सरकारने ज्या व्यक्तींनी अद्याप आयकर भरलेला नाही, अशांसाठी अंमलात आणली आहे. या योजनेअंतर्गत संबंधितांना दंड, व्याजाच्या रकमेपासून सुरक्षित राहता येणार आहे. तसेच योजनेचा कालावधी हा मर्यादित असून येत्या तीस तारखेला हा कालावधी संपणार आहे. तत्पूर्वी व्यक्तींनी करपात्र उत्पन्न जाहीर करून या योजनेअंतर्गत २५ टक्के रक्कम येत्या तीस तारखेपर्यंत भरावी व पुढील २५ टक्के रक्कम आगामी वर्षात ३१ मार्चपर्यंत आणि २५ टक्के आयकराचा अखेरचा टप्पा आगामी वर्षात तीस सप्टेंबरमध्ये पूर्ण करावा. मूळ उत्पन्न जाहीर करण्यासंबंधी असलेल्या विविध शंकांचे निरसन करण्यासाठी तसेच योजनेचे नियम समजून घेण्यासाठी शासनाने आॅनलाइन परिपत्रकही जाहीर केले आहे. या योजनेअंतर्गत कोणतीही छाननी अथवा चौकशी आयकर कायदा व संपत्ती कायद्यानुसार होणार नसल्याचेही यावेळी शुक्ल यांनी स्पष्ट केले. रोख रक्कम, दागिने, स्थावर मालमत्ता आदिंपासून मिळणाऱ्या उत्पन्नाचा करपात्र उत्पन्नामध्ये समावेश होत असून या सर्वांवरील आयकर या योजनेअंतर्गत भरता येऊ शकतो. घोषित उत्पन्नावर जर स्त्रोतामधून कापलेल्या कराचा (टीडीएस) दावा केलेला नसेल तर तोदेखील या योजनेत करता येणार आहे. अचल संपत्तीचे मूल्यांकन खरेदीच्या वेळी भरलेल्या स्टॅम्प ड्यूटीसाठीच्या मूल्यांकनाच्या कॉस्ट इन्प्लेक्शन इंडेक्सप्रमाणे काढलेले मूल्यांकन गृहीत धरले जाईल. या योजनेचा लाभ न घेता कर चुकविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्ध येत्या एक तारखेपासून आयकर विभागाकडून कायदेशीर कारवाई सुरू केली जाणार असल्याचेही यावेळी शुक्ल यांनी सांगितले.
आयकर भरण्याची अखेरची संधी
By admin | Published: September 15, 2016 12:25 AM