नाशिक : अकरावी प्रवेश प्रक्रियेची भाग एक व भाग दोन भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पहिल्या गुणवत्ता यादीत प्रवेशाची संधी मिळालेल्या ११ हजार ५४२ विद्यार्थ्यांपैकी आतापर्यंत ३ हजार ४०६ विद्यार्थ्यांनी संधी मिळालेल्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतले असून, या फेरीत प्रथम पसंतीचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी सोमवारी (दि.९) शेवटचा दिवस उरला आहे.अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीत प्रथम पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांना याच फेरीत प्रवेश घेणे अनिवार्य आहे. या फेरीत प्रवेश न घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील फेरीत सहभाही होता येणार नाही. त्यामुळे पहिल्या फेरीत प्रथम पसंतीचे महाविद्यालय ज्या विद्यार्थ्यांना मिळाले आहे, त्यांना सोमवारी आपला प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन शिक्षण उपसंचालक कार्यालयाने केले आहे. आतापर्यंत मराठी माध्यमातील कला शाखेसाठी वाटप झालेल्या २ हजार ४४ जागांपैकी ५७१ विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले असून, ५ विद्यार्थ्यांचे प्रवेश नाकारण्यात आले व एका विद्यार्थ्याने प्रवेश रद्द केला आहे. तर वाणिज्यच्या २ हजार १६० पैकी ५६५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले असून, ४ विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आला व एका विद्यार्थ्याने प्रवेश रद्द केला. इंग्रजी माध्यमातील कला शाखेसाठी १२ पैकी एकही जागेवर प्रवेश झालेला नाही. वाणिज्य शाखेच्या १९५५ पैकी ६८३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले, तर ६ विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आला आहे. विज्ञान शाखेच्या ५१०० पैकी १४७६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले असून, ६ विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आला आहे. तर एमसीव्हीसीच्या मराठी माध्यमात १९३ पैकी ८० जागांवर प्रवेश झाले असून, इंग्रजी माध्यमाच्या १९ पैकी ५ जागांवर प्रवेश झाले असून, उर्दू माध्यमातील कला शाखेत ३१ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली होती. त्यापैकी १३ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.अशाप्रकारे पहिल्या फेरीत वेगवेगळ्या माध्यमाच्या अभ्यासक्रमासाठी संधी मिळालेल्या ११ हजार ५४२ विद्यार्थ्यांपैकी ३ हजार ४०६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले असून २१ विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आला आहे. तर दोन विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द झाले असून, ८ हजार ११३ विद्यार्थ्यांनी अद्याप प्रवेशासाठी संधी मिळालेल्या महाविद्यालयांमध्ये संपर्क साधलेला नाही.१३ जुलैला दुसरी गुणवत्ता यादीच्पहिल्या फेरीतील प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर १० जुलैला रिक्त जागांचा तपशील व पहिल्या फेरीचा कटआॅफ संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तसेच १० व ११ जुलैला ११ ते ५ या वेळेत अद्याप प्रवेश प्रक्रियेत सहभागी न झालेल्या विद्यार्थ्यांना आॅनलाइन अर्जाचा भाग व दोन भरण्याची संधी मिळणार असून, त्यानंतर १३ जुलैला दुसरी नियमित गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे.
पहिल्या फेरीच्या प्रवेशाचा आज अंतिम दिवस