नाशिक : मतदार नोंदणी अभियान राबविले जात असून, शुक्रवारी (दि. १४) अभियानाचा अखेरचा दिवस आहे. महापालिकेच्या ८९ केंद्रांवर २५ हजार ८२२ मतदारांकडून नोंदणी अर्ज प्राप्त झाले असल्याची माहिती उपआयुक्त विजय पगार यांनी दिली. महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यामार्फत मतदार नोंदणी अभियान राबविले जात आहे. त्यात महापालिकेने सर्व ६१ प्रभाग, सहा विभागीय कार्यालये आणि शहरातील २२ महाविद्यालयांमध्ये मतदार नोंदणीसाठी केंद्र उपलब्ध करून दिले होते. सदर अभियान दि. १५ सप्टेंबरपासून राबविले जात आहे. दि. १२ आॅक्टोबरपर्यंत २५ हजार ८२२ मतदारांनी नोंदणीसाठी अर्ज केले आहेत. यामध्ये २६०३ अर्ज हे विविध महाविद्यालयांमधून प्राप्त झाले आहेत. आॅनलाइनद्वारेही मोठ्या प्रमाणावर अर्ज येत आहेत. शुक्रवारी (दि. १४) मतदार नोंदणीसाठी अखेरचा दिवस असून, जास्तीत जास्त मतदारांनी नोंदणी करावी, असे आवाहन मनपा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. दरम्यान, शहरात सध्या असलेल्या तणावपूर्ण स्थितीमुळे लोकांना घराबाहेर पडणे मुश्किल बनल्याने मतदार नोंदणीच्या कार्यक्रमास १५ दिवसांची मुदतवाढ मिळावी, अशी मागणी मनसेचे गटनेते अनिल मटाले यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. तसेच मतदारांनी मतदार यादीची पडताळणी करून आपल्या नावाची खात्री करून घ्यावी, असे आवाहन जागरूक सुजाण नागरिक संघाने एका पत्रकान्वये केली आहे. (प्रतिनिधी)
मतदार नोंदणी अभियानाचा आज अखेरचा दिवस
By admin | Published: October 14, 2016 12:19 AM