नाशिक : त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या विवाह सोहळ्यात वधूची कौमार्य चाचणी अखेरीस टळली आहे. पोलिसांनी संबंधितांचे जाबजबाब घेतल्यानंतर त्यांनी अशाप्रकारची चाचणीच होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या पाठपुराव्यालादेखील यश मिळाले आहे.
त्र्यंबकेश्वर मार्गावरील एका हाॅटेलमध्ये उच्चशिक्षित वधू -वराचा विवाह सोहळा रविवारी (दि. २१) सायंकाळी पार पडला. जातपंचायतच्या पंचांकडून संबंधित नववधूची लग्नानंतर कौमार्य चाचणी घेण्यात येणार असल्याचा तक्रार अर्ज महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीस प्राप्त झाला होता. त्यामुळे अशा प्रथांच्या विरोधात लढणाऱ्या महाराष्ट्र अंनिसच्या कार्यकर्त्यांनी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात ही कुप्रथा रोखण्याबाबत विनंती अर्ज दिला होता. त्यानुसार पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे यांनी विवाह सोहळा होत असलेल्या हाॅटेल मालकाला नोटीस बजावली. काही अनुचित प्रकार झाल्यास हाॅटेल मालकाला जबाबदार ठरविण्यात येईल असे नोटीसमधून कळविले होते. तसेच रविवारी (दि.२१) सायंकाळी स्वत: पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे आपल्या सहकाऱ्यांसोबत विवाह स्थळी दाखल झाले. त्यांनी जाबजबाबही नोंदवले. यावेळी
अशी कौमार्य चाचणी चाचणीबाबत करण्यात येणार नसल्याचे जबाबात नमूद केले. पोलीसांनी कायद्याची जाणीव करून दिल्यावर अशी कौमार्य परीक्षा होत नसल्याचे व करणार नसल्याचे लेखी लिहून दिले. त्यामुळे अशी कुप्रथा या विवाह सोहळ्यात पार पडली नसल्याचे अंनिसने नमूद केले आहे. या मोहिमेत डाॅ.टी .आर.गोराणे, कृष्णा चांदगुडे, ॲड. समीर शिंदे, नितीन बागुल, महेंद्र दातरंगे, कृष्णा इंद्रीकर, संजय हराळे, दिलीप काळे आदी कार्यकर्ते सामील झाले होते.
काही समाजातील अनेक बांधवांच्या अशा कुप्रथांविषयी तक्रारी आहेत. मात्र, जातपंचायतीच्या दबावाखाली ते असल्याने समोर येत नाहीत. मात्र अशा पिडींतांना पुन्हा आवाहन करून, हा प्रश्न धसास लावण्याचा प्रयत्न करणार आहे.
- कृष्ण चांदगुडे, महाराष्ट्र अंनिस