सिन्नर : सिन्नर नगर परिषदेची २०१६-२१ या पंचवार्षिक काळातील शेवटची सर्वसाधारण सभा बुधवारी सकाळी नगर परिषदेच्या सभागृहात खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सर्व विषयांना मंजुरी देत पंचवार्षिक काळात कारभार केलेल्या पदाधिकाऱ्यांना प्रशासनाच्या वतीने निरोप देण्यात आला. यावेळी सर्व सदस्य भावनावश झाल्याचे दिसून आले.नगर परिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षांसह सदस्य मंडळाचा पंचवार्षिक कार्यकाळ सोमवारी (दि.२९) संपुष्टात आल्याने आता पुढील आदेशापर्यंत कारभार प्रशासकांच्या हाती सोपवण्यात येणार आहे. प्रशासकपदी निफाडच्या उपविभागीय अधिकारी डॉ. अर्चना पठारे यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्या गुरुवारी (दि. ३०) रोजी नगर परिषदेची सूत्रे स्वीकारतील अशी शक्यता आहे.नगराध्यक्ष किरण डगळे यांच्या अध्यक्षतेखाली शेवटची सर्वसाधारण सभा पार पडली. त्यानंतर सर्व नगरसेवकांना पुष्पगुच्छ देत निरोप देण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष किरण डगळे, उपनगराध्यक्ष बाळासाहेब उगले, मुख्याधिकारी संजय केदार यांनी मनोगत व्यक्त करीत पाच वर्षे एकमेकांना सहकार्य केल्याबद्दल आभार मानले. दरम्यान, डिसेंबरअखेर पंचवार्षिक कार्यकाळ संपुष्टात येत असल्याने वॉर्ड रचनेचा कार्यक्रम हाती घेण्यात आलेला होता. तथापि, ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणुका होऊ नयेत, अशी भूमिका राजकीय पक्ष व कार्यकर्त्यांनी घेतल्याने निवडणुका पुढे ढकलतील, अशी अटकळ बांधली जात होती. मात्र, निवडणुका होणार की, पुढे ढकलणार याबाबत अनिश्चितता होती. सध्या कार्यकाळ संपल्याने प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशासकाच्या हाती कारभार गेल्यानंतर शहरातील विकासकामे करणे अथवा नागरिकांच्या समस्या सोडविण्याबाबत मर्यादा येतील का, असा प्रश्न नागरिकांच्या मनात आहे. सदस्य मंडळाचे संपूर्ण अधिकार प्रशासकांना मिळणार असल्याने नागरिकांची गैरसोय होणार नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे नगर परिषदेच्या कामकाजावर कोणताही फरक पडणार नसल्याचे मुख्याधिकारी संजय केदार यांनी सांगितले.इच्छुकांचा हिरमोडसदस्य मंडळाचा पंचवार्षिक कार्यकाळ जसजसा संपुष्टात येत होता. तसतसे गुडघ्याला बाशिंग बांधलेले हौशे-नवसे निवडणुकीच्या तयारीला लागले होते. नेत्यांचे वाढदिवस व त्यानिमित्ताने होर्डिंगबाजीला उधाण आलेले होते. विविध सामाजिक उपक्रम हाती घेऊन जनतेच्या नजरेत भरतील अशा कामांना प्राधान्य दिले जात होते. तूर्त तरी या बाशिंगवीरांचा हिरमोड झाला आहे.
सिन्नर नगर परिषदेच्या अखेरच्या सभेत नगरसेवक भावनावश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2021 10:04 PM
सिन्नर : सिन्नर नगर परिषदेची २०१६-२१ या पंचवार्षिक काळातील शेवटची सर्वसाधारण सभा बुधवारी सकाळी नगर परिषदेच्या सभागृहात खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सर्व विषयांना मंजुरी देत पंचवार्षिक काळात कारभार केलेल्या पदाधिकाऱ्यांना प्रशासनाच्या वतीने निरोप देण्यात आला. यावेळी सर्व सदस्य भावनावश झाल्याचे दिसून आले.
ठळक मुद्देपदाधिकाऱ्यांना निरोप : प्रांत अर्चना पठारे आज पदभार स्वीकारणार?