पंचवटी एक्स्प्रेसनंतर मुंबईला जाणारी सर्वांत सोयीची गाडी म्हणून राज्यराणीकडे बघितले जाते. देवळाली रेल्वे स्टेशनवर मुंबई येथे कामानिमित्त जाणाऱ्या कामगारांची संख्या मोठी असून, अनेक व्यापारी व विद्यार्थी हेदेखील या गाडीचा वापर करीत असतात. याशिवाय देवळाली लष्करी छावणीतील अनेक अधिकारी आणि त्यांचे कुटुंबीय यांना ही गाडी लाभदायी ठरत आहे. कोरोनाकाळात रेल्वे प्रशासनाने अनेक गाड्या रद्द केल्या होत्या. त्यात राज्यराणीचाही समावेश होता. नंतर काही प्रमाणात रेल्वे सेवा सुरळीत करण्यात आली. त्यात पंचवटी व राज्यराणीचा समावेश केल्याने अनेकांना हायसे वाटले. देवळाली कॅम्प, भगूर शहर आणि लष्करी विभाग व सिन्नर इगतपुरी तालुक्यातील सीमेवरील गावातील नागरिकही या गाडीचा नियमित वापर करतात; परंतु रेल्वे प्रशासनाने ही गाडी सुरू करताना इगतपुरीनंतर थेट नाशिकरोड थांबा दिला आहे. त्यामुळे देवळालीकरांना नाशिकरोड येथे जावे लागते. या बाबीचा विचार करून रेल्वे प्रशासनाने पूर्वीप्रमाणेच राज्यराणीला देवळाली कॅम्प येथे थांबा द्यावा, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे सुभाष पोपट बोराडे, वंचितचे शहराध्यक्ष लखन डांगळे, विक्रम पगारे, बाळाराम दोंदे, भीमराव डांगळे, भीमराव खडताळे, संजय जाधव, सचिन गांगुर्डे, राजेश पवार, योगेश भालेराव यांनी केली आहे.
दिडवर्षापासून ‘राज्यराणी’चा देवळाली कॅम्पला ठेंगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 4:14 AM