नाशिक : प्रचारासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले असल्याने दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील सर्वच उमेदवार पायाला भिंगरी बांधल्यागत मतदारसंघ पिंजून काढत आहेत. शुक्रवारी सर्वांनीच गावागावांतील मतदारांच्या, कार्यकर्त्यांच्या गाठीभेटींवर भर दिला असल्याचे दिसून आले.दिंडोरी लोकसभा मतदारसंघात नऊ तालुक्यांचा समावेश असल्याने गेल्या महिनाभरापासून सर्वच प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी प्रत्येक तालुक्यातील गावागावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. जी गावे शिल्लक राहिली त्यांना शुक्रवारी भेटी दिल्या.युतीचा भेटीगाठींवर भरयुतीच्या उमेदवार भारती पवार यांचे पती, सासूबाईही प्रचारात उतरल्या असून, आपापल्या परीने ते प्रचार करीत आहेत. शुक्रवारी पवार यांच्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची येवला येथे सभा झाली. त्यानंतर त्यांनी सायंकाळी वणीत रॅली काढली. गावागावांतील मतदारांच्या भेटी घेण्यावर त्यांनी अधिक भर दिला आहे. प्रचारात तालुका तालुक्यांतील कार्यकर्त्यांना त्या सहभागी करून घेत आहेत.आघाडीची रॅली, बैठकाआघाडीचे उमेदवार धनराज महाले यांनी शुक्रवारी निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत परिसरात दौरा करून विविध गावांत ग्रामस्थांच्या बैठका घेऊन प्रचार केला. त्यानंतर सायंकाळी पिंपळगाव बसवंत शहरात रॅली काढण्यात आली, शुक्रवार असल्याने पिंपळगावातीलच मशिदींना नमाजच्या वेळी त्यांनी भेटी दिल्या. सायंकाळी त्यांच्यासाठी सायखेडा येथे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची सभा झाली. महाले यांच्या सर्व कुटुंबासह मोठे भाऊ, पुतण्याही प्रचारात असून, तेही गावोगावच्या मतदारांच्या भेटी घेत आहेत.माकपच्या वैयक्तिक भेटीमाकपचे उमेदवार जे.पी. गावित यांनी शुक्रवारी कळवण भागातील मतदारांच्या वैयक्तिक भेटी घेतल्या. खर्डे दिगर गणातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठीही त्यांनी नागरिकांची भेट घेऊन त्यांना प्रांतांना भेटण्याचा सल्ला दिला. त्यांची दोन्ही मुलं, पत्नीही प्रचारात असून, तेही मतदारांच्या वैयक्तिक भेटींवर भर देत आहेत. गावागावांतील पोलिंग व्यवस्था जाणून घेत उर्वरित गावांतील मतदारांच्या भेटी ते घेत प्रचार करीत आहेत.वंचित आघाडी गावागावांतवंचित बहुजन आघाडीचे उमेदवार बापू बर्डे यांनी सुरुवातीपासूनच मतदारांच्या वैयक्तिक भेटीगाठींवर भर दिला आहे. शुक्रवारी दिंडोरी मतदारसंघात समावेश असलेल्या मालेगाव तालुक्यातील ५१ गावांपैकी चाळीस गावांना त्यांनी कार्यकर्त्यांसह भेटी दिल्या. घराघरांपर्यंत जाऊन मतदारांना आपली भूमिका ते सांगत आहेत.प्रचाराबरोबरच बूथ नियोजनशनिवारी सायंकाळी प्रचाराचा अखेरचा दिवस असल्याने सर्वच उमेदवारांनी जो भाग राहिला आहे त्या गावातील मतदारांच्या भेटी घेण्याचे नियोजन केले आहे. महिनाभरापासून सुरू असलेल्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहे. प्रचाराबरोबरच बूथ नियोजन, पोलिंग एजंट यांचे नियोजनही सुरू आहे.
अखेरच्या टप्प्यात भेटीगाठींवर भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 12:54 AM