लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : मुस्लीम बांधवांचा उपवासांचा महिना रमजान पर्व अंतिम टप्प्यात आला असून, अखेरचे सात उपवास शिल्लक राहिले आहे. दरम्यान, रात्री पठण केल्या जाणाऱ्या ‘तरावीह’च्या विशेष नमाजदरम्यान ‘अलविदा’चेही पठण सुरू करण्यात आले आहे.रमजान पर्वमधील रविवारी (दि.१८) २२वा उपवास पूर्ण झाला. रमजानचे जेमतेम सात दिवस शिल्लक राहिल्यामुळे धनिक मुस्लीमांकडून दानधर्मावर विशेष भर दिला जात आहे. गेल्या शुक्रवारच्या नमाजदरम्यान मशिदींमधून धर्मगुरूंनी ‘जकात’ या विषयावर प्रवचन देत गोरगरीब व समाजातील गरज, विधवा, अनाथ अशा घटकांचा विचार करत त्यानां अर्थसहाय्य करण्याचे आवाहन केले. एकूण संपत्तीच्या अडीच टक्क्यांप्रमाणे गरजूंचा वाटा अर्थात ‘जकात’ देणे धर्माने धनिकांना अनिवार्य केले आहे, याची आठवण धर्मगुरूंनी प्रवचनातून करून दिली. समाजातील श्रीमंत-गरीब ही दरी कमी व्हावी, हा यामागील उद्देश असल्याचे धर्मगुरूंनी सांगितले. रमजान महिन्याचे अखेरचे सात दिवस राहिल्याने शुक्रवारपासून शहरातील विविध मशिदींमध्ये यंदा ‘ऐतेकाफ’ करण्यास प्रारंभ क रण्यात आला आहे. यंदा तरुणाईचे यामध्ये प्रमाण अधिक आहे. मशिदींमध्ये मुक्कामी थांबून अधिकाधिक वेळ अल्लाहच्या उपासनेसाठी देण्याच्या प्रथेला ‘ऐतेकाफ’असे म्हटले जाते. प्रत्येक मशिदीमध्ये पाचपेक्षा अधिक लोकम ऐतेकाफमध्ये बसले आहेत. त्यांच्या पहाटेच्या अल्पोहारासह संध्याकाळच्या उपवासासाठी लागणारा फलाहार आणि रात्रीच्या भोजनाची व्यवस्था समाजातील काही दानशूर व्यक्तींनी केली आहे. मुस्लीम बांधवांनी रमजान ईदच्या खरेदीची तयारी सुरू केली असून, समाजबांधवांना ईदचे वेध लागले आहे. इस्लामी संस्कृतीमधील सर्वांत मोठा सण म्हणून रमजान ईद ‘ईद-उल-फित्र’ समजला जातो. या सणाने रमजान पर्वची सांगता होते.गुरुवारी ‘शब-ए-कद्र’येत्या गुरुवारी रमजान पर्वच्या २६व्या उपवासाची सांगता संध्याकाळी होणार आहे. संध्याकाळपासून रमजान महिन्याच्या २७ व्या तारखेला प्रारंभ होणार असल्याने पारंपरिक पद्धतीने सालाबादप्रमाणे मुस्लीम बांधव या रात्री ‘शब-ए-कद्र’ साजरी करणार आहे. शब-ए-मेराज, शब-ए-बरात आणि शब-ए-कद्र अशा तीन रात्री वर्षातून सलग एकापाठोपाठ येतात. या तीनही रात्रींचे वेगळे वैशिष्ट्य धार्मिक ग्रंथांमध्ये सांगण्यात आले आहे. धर्मग्रंथ कुराण या रात्री पृथ्वीतलावर अवतरीत करण्यात आल्याच धर्मगुरू सांगतात.ईदगाहवर रंगरंगोटीअवघ्या सात दिवसांवर रमजान ईद येऊन ठेपली आहे. ईदच्या सामूहिक नमाज पठणाचा सोहळा पार पडणार आहे. शहरातील ऐतिहासिक शहाजहांनी ईदगाहच्या वास्तूला रंगरंगोटी करण्यात येत आहे. तसेच परिसरात स्वच्छतेची कामे सुरू करण्यात आली आहे. महापालिकेच्या वतीने येत्या दोन दिवसांतच मैदानाचे सपाटीकरण व ईदगाहच्या ओटयाची दुरूस्ती तसेच तात्पुरत्या स्वरूपात पाण्याचे नळ बसविण्यात येणार असल्याची माहिती मीर मुखतार अशरफी यांनी सांगितले.
रमजान पर्व अंतिम टप्प्यात; धार्मिक कार्यक्रम
By admin | Published: June 19, 2017 1:56 AM