सटाणा : गेल्या एक महिन्याच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर बागलाण तालुक्यातील हरणबारी व केळझर धरणातील अखेरचे पाणी आवर्तन रविवारी सकाळी दहा वाजता दोन्ही प्रकल्पामधून सोडल्यामुळे पाण्याअभावी ठप्प झालेल्या नदीकाठच्या तब्बल सव्वाशे पाणीपुरवठा योजना सुरळीत होऊन टंचाई दूर होण्यास मदत होणार आहे. बागलाण तालुक्यातील हरणबारी व केळझर धरणातील पाण्याचे आवर्तन तब्बल वीस ते बावीस दिवस उशिरा सोडल्यामुळे मोसम व आरम नदीकाठच्या पाणीपुरवठा योजना पाण्याअभावी ठप्प होऊन जलसंकट निर्माण झाले होते. त्यामुळे टॅँकर सुरू करा नाही तर पाण्याचे आवर्तन तरी सोडा, अशी ओरड सुरू झाली होती. जलसंपदा विभागाने शनिवारी सकाळी दहा वाजता हरणबारी धरणामधून ३४४ दशलक्ष घनफूट शिल्लक साठ्यापैकी तीनशे दशलक्ष घनफूट पाणी चारशे क्युसेकने मोसम नदीपात्रात सोडण्यात आले आहे, तर केळझर धरणामधील शिल्लक असलेला ८६ दशलक्ष घनफूट संपूर्ण पाणीसाठा एकशे सत्तर क्युसेकने आरम नदीपात्रात सोडण्यात आले आहे. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार हे अखेरचे पाणी आवर्तन फक्त नदीकाठच्या सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांसाठी सोडण्यात आले असून, अखेरच्या गावापर्यंत हे पाणी पोहोचण्यासाठी नदीकाठच्या खासगी पाणीपुरवठा विहिरींचा वीजपुरवठा खंडित करण्यात करण्यात यावा, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. (वार्ताहर)
हरणबारी, केळझरमधून अखेरचे आवर्तन
By admin | Published: May 29, 2016 11:11 PM