अझहर शेख नाशिकइस्लाम धर्मात अंत्यसंस्काराच्या पद्धतीमध्ये ‘गुस्ल’ अर्थात स्नानाचा विधी हा फार महत्त्वाचा मानला जातो. पुरुष असो अथवा महिला त्यांच्या मृतदेहांना धार्मिक नियमानुसार अत्यंत बारकाईने अखेरचे स्नान घालणे बंधनकारक असते; मात्र बेवारसांचे बाबतीत असे अपवादानेच घडते. अशा बेवारस महिला मृतदेहांचाही अखेरचा प्रवास विधीवत व्हावा, या उद्देशाने वडाळारोडवरील एक महिला गेल्या एक तपापासून मृतदेहांना ‘गुस्ल’ देत अनोखी मानवसेवा करत आहेत.वडाळारोडवरील शिखर सोसायटीमध्ये हमिदा सय्यद (बाजी) राहतात. महिला मृतदेहांना त्यांच्या आई स्नान घालत होत्या. त्यांचे कार्य बघून हमिदा बाजी यांना त्या कार्याची ओळख झाली. तारुण्यात आईसोबत त्या अनेकदा स्नान घालण्यासाठी जात असत. विवाहनंतर २००० सालापासून त्यांनी वारसांच्या महिला मृतदेहांना स्नान घालण्याचे नियम व पद्धती माहीत करून घेतली. कुराणपठण येत असल्यामुळे त्यांना बहुतांश धार्मिक श्लोक मुखोद्गत झाले. त्यामुळे त्यांना महिला मृतदेहांना स्नान घालताना फारशा अडचणी आल्या नाहीत. २००० सालापासून त्यांनी वारसांच्या मयत महिला मृतदेहांना स्नान घालण्यास सुरुवात केली. सर्वप्रथम द्वारका येथील संतकबीरनगर येथे एका मुस्लीम कुटुंबामध्ये वृद्ध महिलेचे निधन झाले त्यावेळी त्यांनी या वृद्धेला अखेरचा विधिवत पारंपरिक पद्धतीने स्नान घातले. तेव्हापासून तर आजतागायत त्यांचे हे कार्य सुरूच आहे. दरम्यानच्या काळात जुने नाशिकमधील खडकाळी येथील युवा मल्टिपर्पज अॅण्ड सोशल ग्रुप या संस्थेने बेवारस मुस्लीम मृतदेहांच्या दफनविधीची जबाबदारी स्वीकारली.
बेवारस महिला मृतदेहांना ‘त्या’ देतात अखेरचा ‘गुस्ल’
By admin | Published: October 16, 2016 1:55 AM