सिडको : महापालिका निवडणुकीचा जाहीर प्रचार संपुष्टात येण्यास चोवीस तासांचा कालावधी शिल्लक असल्याने व त्यातही औद्योगिक वसाहतीला सुटी असल्याने शनिवारी सिडकोत सर्वपक्षीय उमेदवारांच्या प्रचार फेऱ्यांनी परिसर गाजला. सकाळपासून प्रत्येक प्रभागात उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी फेऱ्या काढून खऱ्या अर्र्थाने प्रचाराची पर्वणी साधून घेतली तर काही उमेदवारांनी रविवारी अंतिम प्रचार फेरीचे नियोजन केले. नाशिक महापालिकेच्या निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी तसेही उमेदवारांना पुरेसा कालावधी मिळाला नाही, त्यातच प्रभागाचा विस्तार व मतदारांची संख्या पाहता प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचणे उमेदवारासाठी आवश्यक असले तरी, ते अल्प कालावधीमुळे शक्य होऊ शकलेले नाही. औद्योगिक वसाहत असलेल्या सिडको व सातपूर येथे ८० टक्के कामगार वर्ग असून, त्यांच्या कामांच्या वेळा पाहता, त्याच्या आधारे प्रचाराची वेळ ठरविण्यासाठी उमेदवारांना कसरत करावी लागली. महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरणे, पक्षाची उमेदवारी घेणे, छाननी, माघारीचा कालावधी पाहता सिडको, सातपूरमधील सर्वपक्षीय उमेदवारांना प्रचारासाठी गेला शनिवार हाती लागला, त्यावेळीही सर्वपक्षीय उमेदवारांनी संधी साधून घेतली. प्रचाराच्या शेवटच्या शनिवारी सकाळी नऊ वाजेपासून उमेदवारांनी आपल्या समर्थकांसह प्रचार फेऱ्या काढण्यावर भर दिला. प्रमुख रस्ते, चौकांत काही उमेदवारांनी चौकसभा घेऊन आपल्या उमेदवारीमागची भूमिका विशद करून प्रभागातील प्रमुख समस्या व प्रश्नांचा ऊहापोहही केला. याच दरम्यान, जवळपास सर्वच उमेदवारांनी ध्वनिक्षेपकाच्या माध्यमातून रिक्षाद्वारे प्रचारावरही भर दिला. या प्रचारात चौक सभांवरही भर देण्यात आला. पॅनलमधील उमेदवारांनी एकत्र येत छोटेखानी सभा घेत उमेदवारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. काही ठिकाणी मतदारांनी उमेदवारांचे उत्स्फूर्त स्वागत केले. शनिवारचा दिवस असल्याने बहुतांशी कंपनी कामगार घरीच असल्याने त्यांनीही उमेदवारांच्या प्रचारात सहभाग घेतला. उद्या रविवारी महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस असून, त्यानिमित्ताने दिवसभर प्रचार रॅलींचे आयोजन करण्यात आले आहे.
अखेरचा शनिवार गाजला
By admin | Published: February 19, 2017 12:50 AM