नाशिक : तलवारीने वार करून खुनाचा प्रयत्न करणे तसेच दरोड्याचा गुन्हा न्यायालयात सिद्ध झाल्याने अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही़ ए़ दौलताबादकर यांनी जुन्या नाशकातील पाच आरोपींना सात वर्षे कारावास व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़ २२ एप्रिल २००८ रोजी सारडा सर्कलजवळील एका स्पेअरपार्टच्या दुकानात घुसून आरोपी अर्शद कुतुबुद्दीन मकराणी, अॅड़ अमजद कुतुबुद्दीन मकराणी, इफ्तेकार कुतुबुद्दीन मकराणी, इम्तियाज कुतुबुद्दीन मकराणी, एजाज कुतुबुद्दीन मकराणी यांनी सगीर सय्यद व शाकिब सय्यद या दोघांवर तलवार व कुकरीने वार केले होते. त्यामध्ये हे दोघेही गंभीर जखमी झाले होते़ यानंतर मकराणी बंधूंनी जखमींच्या गळ्यातील सोनसाखळी व गल्ल्यातील तीस हजार रुपये दरोडा टाकून लुटून नेल्याची फिर्याद मोईन अली हुसेन पठाण यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात दिली होती़अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही़ ए़ दौलताबादकर यांच्या न्यायालयात हा खटला सुरू होता़ सरकारी वकील अॅड. गायत्री पटनाला यांनी या खटल्यात अकरा साक्षीदार तपासून आरोपींवर गुन्हा सिद्ध केला़ त्यानुसार न्यायालयाने मकराणी बंधूंना सात वर्षे कारावास व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा, दंड न भरल्यास आणखीन सहा महिने कारावासाची शिक्षा सुनावली, तर मतीन शब्बीर काद्री, हसीफ उमर खान यांची निर्दोष मुक्तता केली़ जुने नाशिक परिसरातील नागरिकांचे या खटल्याकडे लक्ष लागून होते.
जुन्या नाशकातील मकराणी बंधूंना सात वर्षांचा कारावास
By admin | Published: January 08, 2015 12:36 AM