नाशिक : यंदा कमी आणि असमान झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील धरणांची स्थिती गतवर्षीपेक्षा बिकट आहे. गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात धरणांमध्ये ९९ टक्के इतका साठा होता तर यंदा केवळ ८३ टक्के इतकाच जलसाठा असल्याने प्रशासनाला पिण्याचे आणि सिंचनाच्या पाण्याचे नियोजन करताना कसरत करावी लागणार आहे. जिल्ह्यात यंदा केवळ ७० ते ७५ टक्के इतकेच पर्जन्यमान झाले असल्याने परतीच्या पावसापर्यंत धरणे कशीबशी जेमतेम भरली आहेत.
ज्या धरणांमध्ये गतवर्षी शतकभर पाणीसाठा होता, त्या धरणांमध्ये यंदा ८० ते ९० टक्के इतकाच जलसाठा शिल्लक आहे. यावेळी केवळ पाच धरणांमधून काही दिवस विसर्ग सुरू होता तर गोदावरी नदीलादेखील गतवर्षीप्रमाणे पूरपरिस्थिती निर्माण झाली नाही. जिल्ह्यातील काही भागात जोरदार पाऊस तर काही ठिकाणी मोकळे आभाळ अशी एकूणच स्थिती होती. त्यामुळे ठराविक भागात झालेल्या पावसामुळे धरणांमध्ये काही प्रमाणात पाणीसाठा होऊ शकला. परंतु, गतवर्षीच्या तुलनेत साठा कमीच आहे.
धरणांमधून जायकवाडीला पाणी सोडण्याचे आदेश असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून आणि लोकप्रतिनिधींकडून विरोध सुरू झाला आहे.जिल्ह्यात एकूण २४ लहान-मोठे धरण प्रकल्प आहेत. त्यामध्ये ७ मोठे प्रकल्प आहेत तर १७ मध्यम स्वरूपाचे प्रकल्प आहेत. याप्रमाणे असलेल्या २४ प्रकल्पांमध्ये सध्या ८३ टक्के इतका जलसाठा शिल्लक आहे.