नाशिक : जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी लता बनसोड यांनी शनिवारी पदाची सूत्रे स्वीकारून लागलीच स्थायी समितीच्या मासिक बैठकीला हजेरी लावली. नजीकच्या काळात महिलांची उन्नती व व्यक्तिकेंद्रित सर्वांगीण विकासाला आपण प्राधान्य देऊ, अशी ग्वाही त्यांनी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना दिली.श्रीमती लता बनसोड यांची शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नेमणूक करण्यात आल्यानंतर शनिवारी सकाळी अकरा वाजता त्यांनी प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी उज्ज्वला बावके यांच्याकडून पदभार स्वीकारला. त्यानंतर अवघ्या काही वेळातच जिल्हा परिषदेच्या नियोजित स्थायी समितीच्या बैठकीला हजेरी लावली. त्यात त्यांनी आपला स्वत:चा परिचय करून देताना आजवर विविध ठिकाणी केलेल्या कामांची माहिती दिली. बैठक आटोपल्यानंतर प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना त्यांनी आपल्या आगामी कार्यपद्धतीची माहिती दिली. यापूर्वी आपण महिलांची उन्नती व गरिबी निर्मूलनाची कामे केली असून, यापुढेही त्यात सातत्य ठेवण्यात येईल. प्रत्येक गरीब व्यक्तीला केंद्रबिंदू मानून त्याच्यासाठी काय करता येईल, यासाठी आपले प्राधान्य असेल शिवाय उद्दिष्ट साध्य करण्यापेक्षा ज्यांच्यासाठी उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे, त्यांना त्याचा कितपत लाभ देता येईल यावर आपला भर असल्याचे बनसोड म्हणाल्या. पहिल्यांदाच नाशिक जिल्ह्यात काम करण्याची संधी मिळाल्याचेही त्यांनीसांगितले. दरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकारी बनसोड यांनी दुपारनंतर सर्वच खाते प्रमुखांची बैठक घेऊन त्यांच्याकडील तातडीची कामे समजावून घेत त्यात प्राधान्य ठरविण्याच्या सूचना दिल्या.
सीईओ लता बनसोड यांनी स्वीकारला पदभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 1:34 AM