शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
2
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
3
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
4
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
5
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
6
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ३० जणांचा मृत्यू, १७ जखमी
7
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
8
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
9
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
10
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
11
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
12
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
13
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
14
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
15
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं
16
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
17
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video
18
पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन
19
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
20
"वर्षा उसगावकर कोण हे मला माहितच नव्हतं", निक्की पुन्हा बरळली, म्हणाली- "बिग बॉसमध्ये आल्यानंतर..."

उशिरा सुचलेले सामंजस्य..

By admin | Published: November 06, 2016 2:04 AM

उशिरा सुचलेले सामंजस्य..

.किरण अग्रवाल : नाशकातील उड्डाणपुलाशी संबंधित कामाचा प्रारंभ केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या हस्ते होण्यापूर्वी शहरातील तीनही आमदार व खासदारांनी जो श्रेयवादाचा फड रंगविला तो उबग आणणाराच होता. याप्रश्नी ज्याचे त्याचे श्रेय ज्याला त्याला देण्याचे जे सामंजस्य उशिराने दाखविले गेले ते अगोदरच दाखविले गेले असते तर सर्वांसाठीच लाभदायी ठरले असते. परंतु तेवढे भान संबंधित लोकप्रतिनिधींकडून दाखविले गेले नाही.शिमगा हा तसा होळीनंतर होत असतो. पण राजकीय शिमग्याला तशी काळ-वेळ आड येत नसते म्हणूनच की काय, नाशकातील उड्डाणपूल विस्तारीकरणाच्या श्रेयवादाचा शिमगा दिवाळीनंतरच झाल्याचे दिसून आले. एखाद्या शासकीय कामाची जनमानसात चांगली प्रतिमा निर्माण होऊन सरकारबद्दल कौतुकाचे मत निर्माण होण्याऐवजी प्रतिकूलता वा हसेच कसे होऊन जाते, याचे यापेक्षा उत्तम उदाहरण शोधून सापडू नये.मुंबई - धुळे राष्ट्रीय महामार्गावर नाशकात साकारलेला उड्डाणपूल हा समस्त नाशिककरांचा कौतुकाचा विषय ठरलेला असला तरी त्यामुळे काही ठिकाणी वाहतुकीस अडचणी येत असल्याच्या तक्रारी प्रारंभापासून होत आहेत. मुंबईकडून येऊन धुळ्याकडे जाणाऱ्यांच्या दृष्टीने तसेच नाशकातील वाहनांना द्वारका चौकातून या उड्डाणपुलावर चढून दोन्ही दिशांना मार्गस्थ होणे अथवा बाहेरून येणाऱ्यांना नाशिकसाठी द्वारका चौकात उतरणे सोयीचे असले तरी, सिडकोतील स्टेट बँक चौक, इंदिरानगर, के.के. वाघ कॉलेज व त्यापुढील औदुंबरनगर आदि ठिकाणी उड्डाणपूल वा महामार्ग ओलांडणे स्थानिकांसाठी जिकिरीचे ठरत आहे. वेळोवेळी झालेल्या अपघातातून ही बाब निदर्शनास आली असून, त्यासंदर्भात काय करता येईल याची चर्चा व चाचपणी तेव्हापासूनच सुरू झाली होती. केंद्रात व राज्यातही काँग्रेस आघाडीचे सरकार असताना सदर उड्डाणपूल व जुन्या मार्गाचे विस्तारीकरण साकारण्यात आले होते. नाशिकच्याच छगन भुजबळ यांच्याकडे तेव्हा राज्याच्या सार्वजनिक बांधकाम खात्याची धुरा होती, तर खासदारकी समीर भुजबळ भूषवित होते. उड्डाणपूल नागरिकांसाठी खुला झाल्यानंतर हळूहळू जेव्हा त्यासंबंधातील अडचणी समोर येऊ लागल्या तेव्हा महामार्ग प्राधिकरण व बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांसमवेत पाहणी करून त्या अडचणींच्या निराकरणाची प्रक्रियाही चर्चेत येऊन गेली होती. दरम्यानच्या काळात दोन्ही ठिकाणची सरकारे बदलली, माणसे म्हणजे लोकप्रतिनिधीही बदललेत. या बदललेल्या सरकारनेही उड्डाणपुलाशी संबंधित नाशिककरांना होणाऱ्या त्रासाची दखल घेत तातडीने पुलाचे विस्तारीकरण तसेच त्याला जोडणाऱ्या रस्त्यांचा विकास व गरजेच्या ठिकाणी भुयारी मार्गांच्या कोट्यवधी रुपये खर्चाच्या कामाला मंजुरी दिली. या कामांचाच प्रारंभ केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी द्वारका ते नाशिकरोड उड्डाणपुलाची घोषणाही त्यांनी केली. ही कामे नाशिककरांना दिलासा देणारी तसेच त्यांची गैरसोय दूर करणारी असल्याने त्यातून शासनाची लोकोपयोगी प्रतिमा निर्माण व्हावी. पण तसे घडून येण्यापूर्वीच या कामांच्या श्रेयावरून स्थानिक लोकप्रतिनिधींनी जो शिमगा केला तो उगाच मिठाचा खडा ठरून गेला. उड्डाणपुलाच्या बोगद्यामुळे इंदिरानगरवासीयांची झालेली अडचण तसेच द्वारका चौकातून मुंबईकडे जाताना होणारा खोळंबा व तेथील भुयारी मार्गाचा प्रश्न लक्षात घेता नाशकातील आमदार प्रा.सौ. देवयानी फरांदे यांनी अधिकारी तसेच मंत्रीस्तरावर चर्चा करून मध्यंतरी काही अभियंत्यांसह प्रत्यक्ष पाहणीही केली होती. दिल्ली दरबारी गडकरी यांची भेट घेऊन सदर विषय मार्गी लावण्यासाठी त्यांनी चालविलेले प्रयत्न लपून राहिलेले नव्हते. पण सदर उड्डाणपुलाशी संबंधित विस्तारीकरणाच्या कामाचा शुभारंभ गडकरी यांच्या हस्ते होणार म्हटल्यावर त्याचे श्रेय खासदार हेमंत गोडसे यांना देण्यासाठी शिवसेनेचे महानगरप्रमुख पुढे आल्याने आमदार फरांदेंकडून राहावले गेले नाही. त्यातून आमदार-खासदारांमध्ये परस्परांचा बालीशपणा काढला जाऊन त्यांच्यात जुंपल्याचे पाहावयास मिळाले. या दोघांतील श्रेयवादाची लढाई कमी की काय म्हणून भाजपाचेच अन्य एक आमदार व पक्षाचे शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी सदर विस्तारीकरणाचे काम आपण मंजूर करून आणल्याचा दावा केला, तर तिसऱ्या आमदार सौ. सीमा हिरे यांनीही या वाद्यज्ञात आपल्या समिधा टाकत, आपणही गडकरींकडे पाठपुरावा केल्याचे सांगितले. दरम्यान, या श्रेयवादातून आपलीच शोभा होत असल्याचे लक्षात आल्यावर इंदिरानगर बोगद्याशी व द्वारका चौकातील अडचणींशी संबंधित कामे आमदार फरांदे यांच्या पाठपुराव्यामुळे, तर के. के. वाघ कॉलेजच्या पुढील उड्डाणपुलाच्या कामाचे श्रेय गोडसे यांचे, असे एकमेकांना सांभाळून घेत सामंजस्य प्रदर्शिले जाऊन वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र त्यातून एकूणच सत्ताधारी पक्षाचे जे हसे झाले ते थांबू शकले नाही. पक्षाला आणि सत्तेला श्रेय देण्याऐवजी ते आपल्याकडे ओढून घेऊ पाहण्याच्या प्रयत्नांतून हे राजकारण घडून आले, ज्याची सुरुवात शिवसेनेकडून झाली. या पक्षाचे महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांनी शिवसेना खासदारांच्या श्रेयाची सुरसुरी लावली नसती तर पुढील वादाची आतषबाजी घडलीही नसती. परंतु होत असलेल्या कामाचे श्रेय निखळपणे भाजपाला मिळू नये म्हणून शिमगा केला गेला. मुळात, प्रत्येकच प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी अभ्यास लागतो वा परिश्रम घ्यावे लागतात असेही नाही. साधी निवेदनबाजी करीत राहिले तरी श्रेय घेता येते. त्यात उड्डाणपुलासारख्या मोठ्या कामाचा विषय असेल तर त्यावर आपली नाममुद्रा उमटविण्यासाठी सर्वांनीच अपेक्षा बाळगणे ओघानेच येते. प्रस्तुत प्रकार त्यातूनच घडला. नाशकातील तीनही आमदार व खासदारांमध्ये रंगलेली श्रेयवादाची स्पर्धा एकीकडे दिसत असताना दुसरीकडे ओझर, पिंपळगाव (ब), चांदवड परिसरात खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांना तेथील कामांचे श्रेय देणारे भ्रमणध्वनी संदेश भिरभिरत होते. महत्त्वाचे म्हणजे, या श्रेयाच्या लढाईत विरोधी पक्षाचे कुणी नव्हते. गडकरींच्या हस्ते ज्या कामांची सुरुवात करण्यात आली त्यातील काही कामांची चर्चा ‘आघाडी’च्या काळातच होऊन गेली होती. त्यामुळे त्या पक्षांनाही यात उतरता येणारे होते. परंतु ते त्यांच्या विवंचनेत असल्याने गप्प राहिले आणि सत्ताधारी शिवसेना-भाजपातच श्रेयवाद रंगला. अर्थात तोदेखील क्षम्य, कारण या दोघांतील ‘सहचर’ किती व कसे आहे हे सर्वांना ठाऊक आहे. परंतु त्यापुढे जाऊन खुद्द भाजपातीलच तीनही आमदारांनी आपल्या पाठपुराव्याची कीर्ती गायल्याने त्यांच्यातील पक्षांतर्गत सुंदोपसुंदी उघड झाल्याशिवाय राहिली नाही. आता गडकरी यांनी नाशकात ज्या विविध घोषणा केल्या त्याही आम्हीच सुचविल्या होत्या, असे कुणी म्हणू नये म्हणजे मिळविले.