केंद्र सरकारने आधारभूत किंमत योजनेअंतर्गत ४ मे २०२० रोजी लासलगाव बाजार समितीतून कांदा खरेदी सुरू केली होती. ५ ऑगस्ट २०२० पर्यंत ३१ हजार ६९४ क्विंटल कांद्याची खरेदी होऊन कमाल ११८७ रुपये, किमान ५३२ रुपये तर सर्वसाधारण ९५० रुपये भाव मिळाला होता. मात्र यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने नाफेडमार्फत केंद्र सरकारची कांदा खरेदी तब्बल एक महिना उशिराने सुरू झाली. नाफेडने कांदा खरेदीसाठी दोन एजन्सी नेमल्या असल्याचा दावा संबंधित संस्थांकडून केला जाऊन लासलगाव बाजार आवारात कांदा खरेदी सुरू करण्यात आली; परंतु व्यापारी संघटनांनी त्यांना आक्षेप घेत लिलाव बंद पाडले. व्यापाऱ्यांच्या या भूमिकेबद्दल शेतकऱ्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. दरम्यान, यंदा नाफेडकडून जास्तीत जास्त कांदा खरेदीवर भर देण्याचा निर्णय झाला असल्याने एजन्सीमार्फत सुरुवातीला विंचूर येथून तर गुरुवारी लासलगाव येथे कांदा खरेदीला सुरुवात करण्यात आली. नाफेडने ज्या ठिकाणी चाळी उभारल्या आहेत. तेथे जाणारा रस्ता पावसाळ्यात खराब होत असल्याने नाफेडने कांदा खरेदीसाठी घाई चालवली आहे.
कोट...
लासलगाव बाजार समितीत नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे वांदे होतात. नाफेडने कांदा खरेदी सुरू केली यामुळे कांदा व्यापाऱ्यांनी लिलावातून सहभाग काढून घेतल्याने कांद्याचे लिलाव बंद पडले. शेतकऱ्याला नाफेडकडून जास्त दर मिळणार असेल तर व्यापाऱ्यांनी सहकार्य करणे गरजेचे होते.
- पंकज जाधव, कांदा उत्पादक शेतकरी