नाशिक- शहरात दुपार नंतरच अचानक वातावरण बदलले आणि संपुर्ण शहरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे नागरीकांची धावपळ उडाली परंतु त्याचबरोबर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणूकीचा देखील खोळंबा झाला. त्याच प्रमाणे लोकसभा निवडणूकीसाठी प्रचार करणाºया उमेदवार आणि कार्यकर्त्यांची देखील धावपळ उडाली.
नाशिक शहरात उन्हाचा कडाका वाढत असून पारा चाळीस अशांपर्यंत गेला आहे. जिल्ह्यात मालेगाव येथे तर ४३ अंश सेल्सीअस इतकी किमान तापमानाची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून उष्णतेमुळे नाशिककर भाजून निघत असून रस्त्यांवर दिवसभर शुकशूकाट असतो. असे असतानाच रविवारी (दि. १४) अवकाळी पावसाने हजेरी लावून दिलासा दिला. दुपारनंतर वातावरणात बदल झाला आणि ढगांचा गडगडाट सुरू झाला. वादळी वाºयामुळे अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या पडल्या तर काही ठिंकाणी झाडेही पडली. काही वेळातच सिडको, अंबड, सातपुर, नाशिकरोड पंचवटीसह शहराच्या विविध भागात पावसाने हजेरी लावली. पंचवटीत गणेशवाडी मार्केटजवळ वादळी पावसामुळे एक झाड कोसळले परंतु कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही.
दरम्यान, रविवार सुट्टीचा दिवस असल्याने घराबाहेर पडलेल्या नागरीकांचे हाल झाले. त्यांना दुकाने आणि अन्य ठिकाणी आश्रय घ्य्यावा लागला. शहराच्या अनेक भागातील वीज पुरवठा खंडीत झाला आहे.दोनच दिवसांपूर्वी चांदवड, येवला आणि सिन्नरच्या काही भागात अवकाळी पाऊस झाला होता. त्यानंतर आता शहरातही पावसाने हजेरी लावली आहे.