नाशिक : गोदापार्क परिसरातून वाहणाऱ्या लेंडी नाल्याचे पाणी थेट गोदावरी नदीपात्रात मिसळत असून, त्याकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून नाल्याचे पाणी नदीपात्रात मिसळत असले तरी प्रशासनाकडून त्याची दखल घेतली जात नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.गेल्या अनेक महिन्यांपासून हा नाला बंदिस्त नसल्याने नाल्यातील सांडपाणी थेट नदीपात्रात मिसळत आहे. याबाबत मनपा प्रशासनाकडे तक्रार करून प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरदेखील प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नदीपात्रात मिसळणारे दुर्गंधीयुक्त पाणी थांबवायची जबाबदारी कोणाची, असा सवाल नागरिकांनी केला आहे. नदीपात्रात मिसळणारे सांडपाणी पुढे रामकुंड, सीताकुंडात मिसळत असल्याने स्नानासाठी येणा-या भाविकांना याच पाण्यात स्नान करावे लागते परिणामी नागरिकांचे आरोग्य या नदीपात्रात मिसळणारे दूषित व दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे धोक्यात येण्याची दाट शक्यता आहे.एकीकडे महापालिका प्रशासन नदीपात्राची साफसफाई करून प्रदूषण होणार नाही याची दखल घेत असले तरी दुसरीकडे मात्र थेट नाल्यातील पाणी नदीपात्रात मिसळत असताना त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने मनपा प्रशासनाचा भोंगळ कारभार दिसून येत आहे.