नाशिक : नागरिकांना विविध प्रकारच्या परवानग्या व दाखले एकाच ठिकाणी आता उपलब्ध होणार असून, त्यासाठी महापालिकेमार्फत राजीव गांधी भवनसह सहाही विभागीय कार्यालयांत नागरी सुविधा केंद्र बुधवार (दि.५) पासून कार्यान्वित करण्यात आले. येत्या दोन दिवसांत ९ उपकार्यालयांमध्येही सदर सुविधा कार्यान्वित होणार आहे.राजीव गांधी भवन येथे नागरी सुविधा केंद्राचा शुभारंभ महापौर रंजना भानसी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपमहापौर प्रथमेश गिते, आयुक्त अभिषेक कृष्ण तसेच गटनेते शाहू खैरे, सलिम शेख, संभाजी मोरु स्कर, गजानन शेलार तसेच नगरसेवक अजय बोरस्ते, मुकेश शहाणे, समीर कांबळे आदि उपस्थित होते. प्रथम टप्प्यात १६ नागरी सुविधा केंद्र कार्यान्वित होणार आहे. त्यामध्ये मनपा मुख्यालय, तसेच ६ विभागीय कार्यालये व ९ उपकार्यालयांचा समावेश आहे. या नागरी सुविधा केंद्रात मनपामार्फत जवळपास ४५ सेवा पुरविण्यात येणार असून, त्यासाठी महापालिकेस येस बँकेचे सहकार्य लाभले आहे. येस बँकेने सदर नागरी सुविधा केंद्र चालविणेसाठी विनामूल्य मनुष्यबळ उपलब्ध करून दिले आहे. या नागरी सुविधा केंद्रांमध्ये येस बॅँकेमार्फत कॅशलेस व्यवहाराला प्रोत्साहन देण्यात येणार आहे. त्याकरिता बॅँकेमार्फत डेबिट व क्रेडिट कार्डद्वारे नागरिकांना कर भरणा करण्यासाठी प्रत्येक नागरी सुविधा केंद्रास प्रत्येकी एक पीओएस मशीन उपलब्ध करून दिले आहे. सद्यस्थितीत प्रथम टप्प्यात १६ ठिकाणी नागरी सुविधा केंद्र सुरू करण्यात येणार असून, येत्या १५ दिवसांमध्ये अजून ६ ठिकाणी असे एकूण २२ नागरी सुविधा केंद्रे कार्यान्वित करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत नागरी सुविधा केंद्रे ही प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली आहे. ही नागरी सुविधा केंद्र व्यविस्थतरीत्या कार्यान्वित झाल्यानंतर भविष्यात त्याचा विस्तार वाढविण्यात येणार असल्याचे प्रशासकीय सूत्रांनी म्हटले आहे.
नागरी सुविधा केंद्रांचा शुभारंभ
By admin | Published: April 06, 2017 1:42 AM