ठाणगाव : येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने कुष्ठ व क्षयरुग्ण सर्वेक्षण मोहिमेस प्रारंभ करण्यात आला.
ठाणगाव आरोग्य केंद्राअंतर्गत डुबेरे, हिवरे, मनेगाव, पाटोळे या उपकेंद्रांतील १८ गावांतील ६६८७ घरांतील ३६ हजार लोकांचे ३० पथकांद्वारे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे.
दि. १ ते १६ डिसेंबरपर्यंत पहिल्या टप्प्यात असून, आरोग्यसेवक,आशासेविका यांच्याकडून दररोज ५० घरांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्यात व्यक्तीच्या शरीरावरील बधिर चट्टे, तेलकट न खाज येणारा चट्टा असल्यास त्यांची तपासणी उपकेंद्रास्तरावर करून उपचार करण्यात येणार आहे, तर क्षयरुग्ण मोहिमेत दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ खोकला, वजनात घट आदी लक्षणे असणाऱ्या व्यक्तींची तपासणी करण्यात येणार आहे.
या उपक्रमाबाबत डुबेरे उपकेंद्रात १८ गावांतील ३० पथकांतील आशासेविका व आरोग्यसेवक यांना प्रशिक्षण देण्यात आले. ठाणगाव आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी आर.डी. धादवड यांनी घरातील कुटुंबाचा सर्व्हे करताना कोणत्या गोष्टींबाबत जास्त गांभीर्य पाळायचे याबाबत माहिती दिली. यावेळी डॉ. भाग्यश्री परदेशी, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. उपेंद्र अहिरे, डॉ. सतीश केदार, डॉ. वंदना खेडकर, डॉ. श्रद्धा आव्हाड, आशा गटप्रवर्तक ललिता वारुंगसे यांच्यासह १८ गावांतील सर्व आशा व आरोग्यसेवक उपस्थित होते.
-----------
ठाणगाव आरोग्य केंद्राच्या वतीने ‘कृष्ठ व क्षयरुग्ण’ या मोहिमेस प्रारंभ करण्यात आला असून, ग्रामस्थांनी आपल्या घरी येणाऱ्या आशा कार्यकर्ता व आरोग्यसेवकांना खरी माहिती द्यावी. त्यांच्यापासून कोणताही आजार लपवू नये व आपल्याकडे येणाऱ्या आरोग्य विभागाला सहकार्य करावे.
- डॉ. आर. डी. धादवड
वैद्यकीय अधिकारी, ठाणगाव
===Photopath===
021220\02nsk_14_02122020_13.jpg
===Caption===
ठाणगाव येथे कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण या मोहीमेस प्रारंभ करण्यात आला, त्याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. आर.डी.धादवड, डॉ.भाग्यश्री परदेशी, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.उपेंद्र अहिरे, डॉ.सतीश केदार, एस.जी.काळे यांच्यासह आरोग्यसेवक व आशा कार्यकर्त्या.०२ सिन्नर २