सटाणा : शहरात स्वच्छता आणि आरोग्य विभागाशी संबंधित असंख्य महत्त्वपूर्ण निर्णयाची अंमलबजावणी होत असून नगरपालिकेच्या ताफ्यात नव्याने दाखल झालेल्या घंटागाड्यांचे लोकार्पण सोमवारी (दि.१) झाले. याचबरोबर आरोग्य विभागात नव्याने भरती झालेल्या शंभर कर्मचाऱ्यांचेही स्वागत करण्यात आले. दरम्यान, येत्या काळात लवकरच शहर स्वच्छता आणि आरोग्याच्या बाबतीत थ्री स्टार मानांकन प्राप्त करेल, असा विश्वास विश्वास नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी व्यक्त केला.लोकार्पण सोहळ्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना नगराध्यक्ष मोरे यांनी सांगितले, स्वर्गीय पंडित धर्मा पाटील नगराध्यक्ष असताना नगरपालिकेकडे साडेतीनशे स्वच्छता कर्मचारी होते. सद्यस्थितीत ही संख्या अवघी १७० पर्यंत येऊन ठेपली आहे. शहरातील लोकसंख्या आणि विस्तार वाढत असताना स्वच्छता कर्मचा-यांची संख्या कमी झाल्याने शहरवासीयांना सेवा, सुविधा देताना अडचणी येत होत्या. त्यामुळे कर्मचारी संख्या वाढवण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा सुरू करण्यात आला. त्यानुसार काही अनुकंपा तत्त्वावरील तर काही ठेकेदारी पद्धतीने नवीन कर्मचा-यांची नव्याने भरती करण्यात आली आहे. यापूर्वी अठ्ठावीस स्वच्छता झाडू कामगार महिला कर्मचारी होत्या. त्यात आता नव्याने ४३ महिला कर्मचा-यांची भर पडणार आहे. अनुकंपा तत्त्वानुसार अठरा कामगारांच्या वारसांना नव्याने नियुक्ती देण्यात आली असून जवळपास शंभर सफाई कामगारांची भरती ठेकेदारी पद्धतीने करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात शहरातील स्वच्छतेचे चित्र मोठ्या प्रमाणात बदललेले दिसेल असा विश्वास मोरे यांनी व्यक्त केला. सद्यस्थितीत सार्वजनिक शौचालयांची एकवेळा स्वच्छता होते, ती यापुढील काळात दोन ते तीन वेळा करण्यात येणार आहे. यापुढील काळात शहरातील दैनंदिन स्वच्छता कामाचा उरक वाढण्यासाठी नव्याने पंधरा घंटागाड्या खरेदी करण्यात आल्या असून ज्याठिकाणी त्या पोहोचत नाहीत त्याठिकाणी तीन सायकल रिक्षासुद्धा पालिकेने खरेदी केल्या आहेत. अकरा हजार मालमत्ताधारकांना प्रत्येकी दोन याप्रमाणे छोट्या स्वरूपातील कचराकुंड्या वाटप करण्यात आल्या आहेत. यापुढील काळात कच-यावर शास्त्रशुद्ध पद्धतीने प्रक्रि या करण्याची कार्यप्रणाली विकसित करण्यात येणार असल्याचे सूतोवाचही मोरे यांनी केले.
सटाण्यात नवीन घंटागाड्यांचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2019 3:57 PM
स्वच्छतेचा निर्धार : आरोग्य विभागात शंभर कर्मचा-यांची भरती
ठळक मुद्दे अकरा हजार मालमत्ताधारकांना प्रत्येकी दोन याप्रमाणे छोट्या स्वरूपातील कचराकुंड्या वाटप करण्यात आल्या आहेत.