गंगापूररोड : चित्रकार कमलाकर शेवाळे व अविनाश वडघुले यांच्या संयुक्त कला चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन वास्तुविशारद संजय पाटील यांच्या हस्ते कुसुमाग्रज स्मारकातील छंदोमयी कलादालनात दीपप्रज्वलन करून पार पडले. उद्घाटनप्रसंगी शेवाळे व वडघुले यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी चित्रकार अशोक धिवरे, अतुल भालेराव, राहुल भामरे, सुधीर शिंगणे, माजी नगरसेवक अमोल जाधव यांच्यासह कलाशिक्षक व मान्यवर उपस्थित होते. कार्यक्र माचे सूत्रसंचालन मिलिंद पाटील यांनी केले. कुसुमाग्रज स्मारकातील छंदोमयी कलादालनात उष्ण रंगसंगतीत व अमूर्त शैलीतील दर्जेदार चित्रांचे प्रदर्शन पाहण्याची नामी संधी नाशिककरांना उपलब्ध झाली असून, गुरु वारपासून सुरू झालेले प्रदर्शन १४ मेपर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे. सटाण्याचे कलाशिक्षक व चित्रकार कमलाकर शेवाळे व नाशिकचे चित्रकार अविनाश वडघुले यांनी आपल्या विशेष शैलीत चितारलेली सुमारे सत्तर चित्रे या प्रदर्शनात लावण्यात आली आहेत. शेवाळे यांनी पारदर्शक जलरंगात विविध निसर्गचित्रे रेखाटली आहेत. त्यांनी उष्ण रंगांचा वापर करून वेगवेगळे ऋतू व गावाकडचा निसर्ग दाखविण्याचा प्रयत्न केला असून, नेहमीच्या हिरव्यागार सौंदर्याला सोडून उष्ण रंगाची विलोभनीयता भडक न भासता कोमलता त्यांच्या चित्रात पाहावयास मिळते, तर वडघुले यांनी अॅक्रे लिक रंगाचा अतिशय नावीन्यपूर्ण वापर करत अमूर्त शैलीतील चित्रे रंगविली आहेत. विविध आकारांतील चित्रे घराची शोभा वाढवतील अशी रंगसंगती वडघुले यांनी वापरली आहे. कलारसिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
कमलाकर शेवाळे , अविनाश वडघुले यांच्या चित्रकला प्रदर्शनाचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 12:20 AM