नाशिक : ‘स्वच्छ, सुंदर व निरोगी नाशिकसाठी काहीपण...’ अशी टॅगलाइन घेऊन समाजापुढे सतत काही ना काही नवीन ठेवणाऱ्या ‘नाशिकैवं कुटुंबकम्’ या स्वयंसेवी संस्थेच्या संकल्पनेतून नाशिक महापालिका आता ‘सायंकाळची घंटागाडी’ हा उपक्रम राबविणार असून, त्याचा शुभारंभ सोमवारी (दि.१२) प्रभाग २४ मधील टिळकवाडी, तिडके कॉलनी, राका कॉलनी परिसरातून होत आहे. प्रायोगिक तत्त्वावर सुरू होणारा या उपक्रमाला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन अन्य प्रभागांमध्येही स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून सदरचा प्रकल्प राबविण्याचा महापालिकेचा विचार आहे.नाशिक महापालिकेमार्फत सर्व प्रभागांमध्ये घंटागाड्या फिरून कचरा गोळा करत असतात. सदर घंटागाड्या या सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्रभागांमध्ये संचार करत असतात. सायंकाळनंतर मात्र ठिकठिकाणी कचरा पुन्हा तयार होतो. घर-दुकान यामधील कचरा झाडलोट करून रस्त्यालगत टाकून दिला जातो. सायंकाळच्या या कचऱ्याची समस्या कशी सोडवायची याबाबत ‘नाशिकैव कुटुंबकम्’ ही सेवाभावी संस्था विचार करत होती आणि त्यातूनच ‘सायंकाळची घंटागाडी’ हा प्रकल्प पुढे आला. त्यानुसार संस्थेने प्रभाग २४ मध्ये टिळकवाडी, तिडके कॉलनी, श्री कालिका मंदिर तसेच राका कॉलनी परिसरातील घर, दुकान, रस्त्यावरील कोणत्याही प्रकारचा कचरा सायंकाळी ५ ते ८ या वेळेत उचलण्यासाठी घंटागाडीची व्यवस्था केली आहे. सदर घंटागाडी या तीन तासांत परिसरात फिरून कचरा स्वत:हून गोळा करेलच शिवाय परिसरातील नागरिक-व्यावसायिकांनी ७२७६०५३५०९ या क्रमांकावर फोन केल्यास सदर गाडी कचरा नेण्याची व्यवस्था करणार आहे. या उपक्रमामुळे परिसर स्वच्छ राहण्यास मदत होणार आहे. संस्थेने त्यासाठी एक स्वतंत्र वाहन तयार केले असून, दोन कर्मचारी उपलब्ध असणार आहेत. तीन तासांत कचरा गोळा झाल्यानंतर सदरचा कचऱ्याची खतप्रकल्पावर विल्हेवाट लावण्यासाठी तो महापालिकेच्या संबंधित यंत्रणेकडे सुपूर्द केला जाणार आहे. या उपक्रमाचा शुभारंभ सोमवारी (दि.१२) सायंकाळी ७.३० वाजता कुटे आय हॉस्पिटलजवळ, कुटे मार्ग, तिडके कॉलनी याठिकाणी महापालिकेचे आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या हस्ते होणार आहे. (प्रतिनिधी)
आज शुभारंभ : ‘नाशिकैवं कुटुंबकम्’च्या सहकार्याने उपक्रम
By admin | Published: January 12, 2015 12:26 AM