विजय मोरे, नाशिक गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांकडून राहिलेल्या त्रुटी, न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार द्यावयाचे प्रतिज्ञापत्र, कायदेविषयक मार्गदर्शन व सल्ला याचे ज्ञान पोलिसांना प्राथमिक स्तरावरच मिळणे आता शक्य होणार आहे़ शहर पोलीस आयुक्तालयास तीन विधी अधिकारी मिळणार असून, या पदासाठी सोमवारी (दि़५) लेखी परीक्षा झाली़ या परीक्षेचा साधारणत: एका आठवड्यात निकाल लागून हे विधी अधिकारी आयुक्तालयात रुजू होणार असून, कायदेशीर मदतीबरोबरच न्यायालयीन खटल्यांमध्ये दोषसिद्धीची संख्या वाढेल, अशी अपेक्षा आहे़
खून, दरोडा, विनयभंग, फसवणूक असो की चोरी पोलीस या गुन्ह्यांचा तपास त्यांच्या नेहमीच्या साचेबद्ध पद्धतीने करून गुन्हेगारांना गजाआड करतात़ मात्र, फिर्याद घेताना, जबाब नोंदविताना तसेच पुरावे गोळा केल्यानंतर त्यांचा अहवाल तयार करताना त्यांच्याकडून चुका होतात़ कायद्याचे परिपूर्ण व अद्ययावत नसलेले ज्ञान तसेच न्यायालयात सादर करण्यासाठी आवश्यक असणारे पुरावे, याबाबत मार्गदर्शन मिळत नसल्याने बहुतांशी गुन्हेगार न्यायालयातून सुटून जातात वा त्यांना पोलीस कोठडीऐवजी न्यायालयीन कोठडी व त्यानंतर जामीनही मिळतो़ पोलिसांना कायदेविषयक ज्ञान तसेच पोलीस तपासातील त्रुटी समजावून सांगण्यासाठी शहर पोलीस आयुक्तालयात तीन विधी अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाणार आहे़
यासाठी डिसेंबर २०१६ मध्ये जाहिरात काढून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते़ या पदासाठी सोळा वकिलांनी अर्ज केले होते़ त्यापैकी पंधरा उमेदवारांनी लेखी परीक्षा दिली असून, याचा निकाल एका आठवड्यात लागणार आहे़ कायद्याचे सखोल व अद्ययावत विधी अधिकारी मिळाल्यानंतर न्यायालयीन दोषसिद्धीचे प्रमाण वाढेल, असा आशावाद पोलीस आयुक्तांनी व्यक्त केला आहे़
पोलिसांना याबाबत मार्गदर्शन
* पोलिसांना कायदेविषयक मार्गदर्शन व सल्ला देणे़ * तपासातील त्रुटी निदर्शनास आणून देणे़ * न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांमध्ये सरकारी वकिलांना मदत करणे़ * पोलिसांना न्यायालयात द्यावे लागणारे प्रतिज्ञापत्र तयार करून देणे़ * न्यायालयातील खटल्यात पोलिसांना मुद्देनिहाय उत्तर तयार करून देणे़ * गुंतागुंतीच्या गुन्ह्यात कोणत्या कलमान्वये गुन्हा दाखल करावा, याबाबत मार्गदर्शन करणे़
शहर पोलीस आयुक्तालयासाठी विधी अधिकारी पदाच्या तीन पदांसाठी डिसेंबरमध्ये जाहिरात काढण्यात आली होती़ त्यानुसार सोमवारी (दि़५) परीक्षा घेण्यात आली असून, साधारणत: एका आठवड्यात या परीक्षेचा निकाल अपेक्षित आहे़ या विधी अधिकाऱ्यांकडून पोेलिसांना मार्गदर्शन मिळणार असून, यामुळे गुन्हे दोषसिद्धीचे प्रमाण वाढण्यास नक्कीच मदत होणार आहे़
- डॉ़ रवींद्र सिंगल, पोलीस आयुक्त, नाशिक