नाशिक : शहरात बाजारपेठा, आठवडे बाजार, मॉल, बार, हॉटेल्स, वेगवेगळी एक्झिबिशन, प्रदर्शने, खेळाची मैदाने, राजकीय सभा-संमेलने येथे तर गर्दी सातत्याने दिसून येते. आता यातील बाजारपेठा, मॉल, हॉटेल्स दुकाने वेळेच्या निर्बंधांनुसार अथवा ५० टक्के क्षमतेने सुरू राहणार असताना विवाह सोहळ्यांवरच निर्बंध आणले जात असल्याची खंत व्यक्त करताना कोरोना केवळ विवाह सोहळ्यांतूनच होतो का, असा सवाल लॉन्स व मंगल कार्यालय संघटनेकडून उपस्थित केला जात आहे. विवाह सोहळ्यावंरील निर्बंध कडक केल्याने ग्राहकांनी ॲडव्हान्स परत मागण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे व्यवसाय अडचणीत आल्याने संघटनेचे प्रतिनिधी मंडळ आगामी दोन ते तीन दिवसात प्रशासनासमोर भूमिका मांडणार आहे.
जिल्हा प्रशासनाने कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन १५ मार्चनंतर विवाह सोहळ्यांच्या आयोजनाविषयीचे निर्बंध आणखी कडक केले आहेत. त्यामुळे लॉन्स व मंगल कार्यालयांच्या यापूर्वी बुक झालेल्या तारखाही आयोजकांकडून रद्द करण्यास सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे १५ ते २२ एप्रिल या कालावधीत विवाहाचे मुहूर्त तुलनेने कमी असले तरी या कालावधीत साखरपुडे व घरगुती सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात बुकिंग झाले होते. त्याचप्रमाणे अनेकांनी एप्रिल व मे महिन्यांतील तारखाही आत्ताच बुक करून ठेवल्या होत्या. मात्र या सर्व आयोजकांकडून आता लॉन्स व मंगल कार्यालयांकडून दिलेली आगाऊ रक्कम परत मागितली जात आहे. त्यामुळे लॉन्स व मंगल कार्यालयांसह केटरर्स, लाइटिंग, मंडप, डेकोरेशन, बॅण्ड, डीजे, हार, माळा, फुले, लग्नपत्रिका, प्रिंटिंग, घोडा असे विविध घटकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे व्यवसायाला एक आशेचा किरण दिसू लागला होता. मात्र, निर्बंध कडक केल्याने हा व्यवसाय संकटात आला आहे.
कोट-
लॉन्स व मंगल कार्यालयांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. ग्राहकांनी दिलेले ॲडव्हान्स परत मागण्यास सुरुवात केली असून, एप्रिल, मे महिन्यातील तारखाही रद्द होऊ लागल्याने व्यावसायिकांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. त्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसात संघटनेचे प्रतिनिधी मंडळ प्रशासनासमोर व्यावसायिकांची भूमिका मांडणार आहे, शहरात बाजारपेठा, आठवडे बाजार, मॉल, बार, हॉटेल्स, वेगवेगळी एक्झिबिशन वेळेच्या निर्बंधानुसार किंवा ५० टक्के क्षमतेने सुरू असताना लॉन्स, मंगल कार्यालयावरच बंधने का, कोरोना केवळ विवाह सोहळ्यांतूनच पसरतो का, असा व्यावसायिकांचा सवाल आहे.
- सुनील चोपडा, अध्यक्ष, लॉन्स व मंगल कार्यालये संघटना.
कोट -
एप्रिल किंवा मे महिन्यात कुटुंबातील विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यासाठी लॉन्स बुक करण्याची तयारी सुरू होती. एक लॉन्स निश्चितही केले होते. परंतु. विवाह सोहळ्यांवरील निर्बंध कडक केल्याने आता विवाहाची तारीख आणखी पुढे ढकलण्याचा अथवा घरगुती सोहळा करण्याचा विचार कुटुंबात सुरू आहे.
- राजेश जाधव, वरपिता
इन्फो-
ॲडव्हान्स परत मिळविण्याचे प्रयत्न
विवाह सोहळ्यासाठी लॉन्स बुक केले होते. परंतु, आता लॉन्सवर सोहळा करण्यापेक्षा घरगुती सोहळाच अधिक सोयीचा ठरणार आहे. त्यामुळे लॉन्स चालकाला दिलेला ॲडव्हान्स परत मिळविण्यासाठी प्रयत्न करावे लागणार असल्याचे एका वधुपित्याने सांगितले.