नाशिक : कामगार कायद्यासह विधी आणि भूसंपादन प्रकरणांशी संबंधित महत्त्वपूर्ण दावे हाताळण्यासाठी महापालिकेकडून पॅनलवर निष्णात व अनुभवी वकिलांची नियुक्ती केली जाणार असून, त्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आजवर पॅनलवरील वकिलांबाबत स्थायी अथवा महासभांमध्ये सदस्यांकडून विविध प्रकरणांविषयी नाराजीचा सूर प्रकट झाल्याने महापालिकेने वकिलांचे नव्याने पॅनल तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेत विधी, कामगार कल्याण, मिळकत व्यवस्थापन, भूसंपादन यासारखे महत्त्वाचे विभाग कार्यरत आहेत. ज्यांचा नेहमी न्यायालयाशी संबंध येत असतो. भूसंपादनाचे अनेक प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत तर विविध ठेक्यांविषयीचे वाद न्यायालयात गेलेले आहेत. अनेक प्रकरणात महापालिकेच्या विरोधात निकाल लागल्याने वेळोवेळी स्थायी समिती, महासभांमध्ये नगरसेवकांकडून वकिलांबाबत नाराजीचा सूर प्रकट झालेला आहे. चांगले व निकाल देणारे वकील नेमण्याचीही मागणी वारंवार झालेली आहे. त्याच पार्श्वभूमीवर महापालिकेने आता पॅनलवर निष्णात व अनुभवी वकील घेण्यासाठी पावले उचलली आहेत.
नाशिक महापालिकेला हवेत निष्णात वकील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 1:27 AM