नाशिक : आगामी सिंहस्थाच्या पाश्व'भूमीवर महापालिकेच्यावतीने तयारी करण्यात येत असून तपोवनातील गोदावरी कपिला संगमाजवळ हरिद्वार ऋषीकेशच्या धर्तीवर लक्ष्मण झुला बांधण्याची तयारी बांधकाम विभागाच्यावतीने सुरू केली आहे.
बांधकाम विभागाने या कामाचा सिंहस्थ आराखड्यात समावेश केला आहे. जेणेकरुन या नव्या पूलामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडेल व पर्यटकांच्या आकर्षणाचा मुख्य केंद्र ठरेल हा मुख्य उद्देश आहे. सिंहस्थासाठी येणाऱ्या जगभरातील भाविकांसाठी ही एक पर्वणीच ठरणार आहे. गोदावरीच्या पुरामुळे रामसेतू पुलाला तडे गेल्याने त्याचा वापर धोकादायक झाला असून त्या ठिकाणी विस्तार करत महापालिकेच्यावतीने अत्याधुनिक सोयींचा पूल तयार करण्यात येणार आहे. दरम्यान स्मार्ट सिटिने केलेल्या स्ट्रक्चरल आॅडिटमध्ये या पुलाचे फाऊंडेशन जरी भक्कम असले तरी वरील सरफेस धोकादायक असल्याचा निष्कर्ष दिला होता.
गोदावरी नदीवर ऐतिहासिक रामसेतू पूल हा पंचवटी आणि नाशिक शहराला जोडणारा मोठा दुवा आहे. गोदावरीला आलेल्या पुरामुळे पाण्याचा तडाखा बसल्याने रामसेतू पुलाला तडे गेले आहेत. त्याचा वापर धोकादायक झाला आहे. स्मार्ट सिटिच्या स्ट्रक्चर ऑडिटमध्ये पुलाचा सरफेस धोकादायक असल्याचे सांगण्यात आले. कुंभमेळ्यापुर्वी या पुलाच्या ठिकाणी अत्याधुनिक पूल बांधण्याचा प्रस्ताव बांधकाम विभागाने तयार केला आहे. त्याचाही समावेश सिंहस्थ आराखड्यात करण्यात आला आहे.